Homeअंतरराष्ट्रीयरशियाचा युक्रेनवर ७२८ ड्रोन; १३ क्षेपणास्त्रांद्वारे मोठा हल्ला

रशियाचा युक्रेनवर ७२८ ड्रोन; १३ क्षेपणास्त्रांद्वारे मोठा हल्ला

कीव : वृत्तसंस्था
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा आरोप युक्रेनने केला आहे. युक्रेनच्या वायुदलानुसार, रशियाने एकूण ७२८ ड्रोन व १३ क्षेपणास्त्रांचा मारा केला. युक्रेनच्या हवाई संरक्षण यंत्रणांनी यातील ७१८ ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे.

पश्चिम युक्रेनमधील लुत्स्क शहराचे महापौर इगोर पोलिशचुक यांनी सांगितले की, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. हा हल्ला गेल्या आठवड्यातील रशियाच्या विक्रमी हल्ल्यालाही मागे टाकणारा ठरला आहे. मागील आठवड्यात रशियाने एकूण ५५० ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली होती, मात्र यावेळी तो आकडा लक्षणीयरीत्या वाढवण्यात आला.

हा हल्ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनला अधिक शस्त्रास्त्रे पुरविण्याची घोषणा केल्यानंतर लगेचच करण्यात आला. ट्रम्प यांनी याआधीच्या धोरणात बदल करत रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर ‘बकवास’ वक्तव्य केल्याचा आरोपही केला आहे.

रशियाचा युद्धविरामाला नकार : झेलेन्स्की
दरम्यान, युक्रेनचे अध्यक्ष व्लोदोमीर झेलेन्स्की यांनी रशिया सतत शांततेच्या प्रयत्नांना नाकारत असल्याचा पुनरुच्चार केला. त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, हा हल्ला खूप काही सांगून जाणारा आहे. अनेक देशांनी युद्धविराम व शांततेसाठी प्रयत्न केले, परंतु रशिया त्याला सातत्याने नकार देत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR