24 C
Latur
Saturday, February 14, 2026
Homeराष्ट्रीयराजदच्या कार्यकारी अध्यक्षपदी तेजस्वी यादव

राजदच्या कार्यकारी अध्यक्षपदी तेजस्वी यादव

लालू यादवांनी पक्षात केले मोठे बदल

पाटना : राष्ट्रीय जनता दलाचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून तेजस्वी यादव यांची निवड झाली आहे. आज पाटणा येथे राजदच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि मीसा भारती यांच्यासह पक्षाचे जवळजवळ सर्व मोठे नेते उपस्थित होते. बैठकीदरम्यान, राजदचे बिहार प्रदेश अध्यक्ष मंगणी लाल मंडल यांनी याची घोषणा केली.

पाटणा येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या राजद राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत भोला यादव यांनी हा प्रस्ताव मांडला. लालू प्रसाद यांच्या सूचनेनुसार मांडण्यात आलेल्या या प्रस्तावाला कार्यकारी सदस्यांनी हात वर करून पाठिंबा दिला. लालू प्रसाद यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे पक्षाने पहिल्यांदाच कार्यवाहक अध्यक्ष निवडला आहे. तेजस्वी यांना अध्यक्षाचे सर्व अधिकार देण्यात आले आहेत. राजद नेत्याने सांगितले की, बैठकीत उपस्थित असलेल्या जवळजवळ सर्व नेत्यांनी तेजस्वी यादव यांना जबाबदारी देण्याची मागणी केली. पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की तेजस्वी यादव हे आता बिहार आणि राजदचे भविष्य आहेत. त्यानंतर तेजस्वी यादव यांची पक्षाचे नवे कार्यकारी प्रमुख म्हणून एकमताने निवड करण्यात आली.

लालू प्रसाद यादव यांनी तेजस्वी यादव यांना प्रमाणपत्र दिले. राजदने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर ट्विट करून तेजस्वी यांच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्तीची बातमी शेअर केली. ही राजदमधील एका नवीन युगाची सुरुवात असल्याचे या पोस्टमध्ये म्हटले.

गेल्या वर्षी बिहार विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर, राष्ट्रीय जनता दलाने त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला, तिथे नेतृत्व संबंधीत महत्वाचा निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा होती. त्यानंतर, तेजस्वी यादव यांची पक्षाचे नवे राष्ट्रीय कार्यकारिणी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. १९९७ मध्ये जनता दलातून फुटल्यानंतर राजदची स्थापना करणारे लालू प्रसाद यादव पक्षाच्या स्थापनेपासूनच सर्वोच्च पदावर आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR