नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मिझोराममधील सैरांगहून नवी दिल्लीकडे जाणा-या ‘राजधानी एक्स्प्रेस’च्या अपघातात आठ हत्ती ठार, तर एक हत्ती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आसाममधील होजाई जिल्ह्यातील छंगजुराई भागात मध्यरात्री २ वाजून १७ मिनिटांच्या सुमारास घडली आहे.
याबाबत वन विभागाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्तींचा कळप रेल्वे रुळ ओलांडत असताना रेल्वेला धडक लागली. या धक्क्यामुळे इंजिनसह पाच डबे रेल्वे रुळावरून घसरले. मात्र, या अपघातात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. ही घटना गुवाहाटीपासून सुमारे १२६ किमी अंतरावर घडली.
अपघातानंतर काही कालावधीसाठी रेल्वे सेवा विस्कळीत झाली, काही रेल्वेंचे मार्ग बदलण्यात आले. रेल्वे प्रवाशांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे. रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी कपिंजल किशोर शर्मा यांनी सांगितले की, घसरलेल्या डब्यांतील प्रवाशांना इतर डब्यांमध्ये जागा देण्यात आली आणि सकाळी सहा वाजता ही राजधानी एक्स्प्रेस गुवाहाटीकडे रवाना झाली. गुवाहाटी रेल्वे स्थानकावर या रेल्वेला आणखी डबे जोडले जातील.
वन विभागाकडून हत्तींच्या मृत्यूची माहिती
वन विभागाचे अधिकारी म्हणाले की, हत्तींचा कळप रेल्वे रूळ ओलांडत असताना धडक लागल्यामुळे आठ हत्ती ठार झाले आहेत तर एक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात वन्यजीवनासाठी धक्कादायक ठरला आहे. रेल्वे व वन विभाग या घटनेचा सखोल तपास करत आहेत.

