अहमदपूर : रविकांत क्षेत्रपाळे
तालुक्यात खूपच अत्यल्प पाऊस पडला आहे. यामुळे खरिपाचे सोयाबीन, कापूस, तूर ही पिके हातातून गेली आहेत. यामुळे शेतक-यांची झोप उडाली असून कामगार, कष्टकरी, मजूरदार यांना दसरा या सणानंतर कसलेच काम मिळत नसल्याने आतापासूनच चिंता लागली आहे. आमदार निधीच्या कामाचे अद्यापही काही नियोजन केले नाही. मग शेतक-यांसह सर्वांसाठी दुष्काळी कामे कधी सुरू होणार. सरकारने प्रत्येक मतदारसंघासाठी २५ लाख मंजूर केल्याची समजते. म्हणजे सरकारचे काम राजा उदार झाला आणि सर्वांच्या हाती भोपळा दिला असेच म्हणावे लागेल.
अहमदपूर मतदारसंघात अहमदपूर आणि चाकूर या दोन तालुक्यांचा समावेश आहे. या दोन तालुक्यासाठी सरकार या दुष्काळामध्ये फक्त २५ लाख निधी खर्च करणार आहे. सरकारने या दुष्काळामध्ये प्रत्येक मतदारसंघाला किमान १०० कोटी रुपयांची कामे दसरा या सणानंतर लागलीच सुरू करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सरकारने प्रत्येक शेतक-यांना त्यांच्या शेतात विहीर मंजूर करून विहिरीची कामे सुरू करणे याचबरोबर त्यांना शेततळे मंजूर करून ही कामे ही कामे दुष्काळामध्ये करून घेणे खूपच गरजेचे आहे.
या तालुक्यातील ग्रामपंचायतींना गावातील व शिवारातील कोणती महत्त्वाची कामे करायची आहेत याचे प्रस्ताव तातडीने पंचायत समितीला पाठविण्यासाठी सूचना देणे किंवा जीआर काढणे खूप गरजेचे आहे. प्रशासनाने दुष्काळाच्या अनुषंगाने उपाय योजनांचा तालुक्याचा प्रस्ताव अद्यापही तयार केला नसल्याचे समजते. सरकारी काम आणि सहा महिने थांब. अशी सरकारची अवस्था आहे. शेतक-यांना ,कष्टक-यांना , मजूरदार यांना जिवंत ठेवायचे असेल तर सरकारने तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे. शेतक-यांनी घाबरू नये, त्यांना वा-यावर सोडणार नाही ,कामगारांनी घाबरू नये, त्यांच्या हाताला काम देणार अशा फुजुल, वायफळ, वल्गना करणे मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंद करावे. सर्वांना जिवंत ठेवायचे असेल तर अगोदर कामे जाहीर करा आणि ती त्वरित सुरू करा अशी सर्वांची मागणी आहे.
















