मुंबई : प्रतिनिधी
सध्या रितेश देशमुख यांच्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाची खूप उत्सुकता आहे. या सिनेमात संगीतकार अजय-अतुल या जोडीपैकी अतुल गोगावलेंचा लेक रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या गाण्यात अतुल गोगावलेंचा लेक आर्य गोगावलेची झलक बघायला मिळाली. ‘राजा शिवाजी’ सिनेमाचं जे अँथम साँग रिलीज झालं त्यात आर्य बघायला मिळाला.
अतुल गोगावले यांनी सोशल मीडियावर लेकाचा फोटो पोस्ट करून सर्वांना ही आनंदाची बातमी दिली. आर्यला अभिनय करताना पाहताच अनेकांनी त्याचे कौतुक आणि अभिनंदन केले आहे.
सिनेमात झळकणा-या अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांनीही आर्यच्या पदार्पणाचे कौतुक करत, ‘आम्हाला तुझा अभिमान आहे. आमचे प्रेम आणि आशीर्वाद कायमच तुझ्या पाठीशी आहे’, अशा शब्दांमध्ये आर्यवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
आर्य स्पोर्टस्च्या दुनियेतही सक्रिय असून त्याला किकबॉक्सिंगची आवड आहे. त्याने किकबॉक्सिंग प्रकारात २ सुवर्णपदकंही मिळवली आहेत. एकूणच खेळाची दुनिया गाजवून आर्य आता मोठा पडदा गाजवायलाही सज्ज आहे.
‘राजा शिवाजी’ सारख्या इतक्या मोठ्या प्रोजेक्टचा भाग झाल्यामुळे आर्य सध्या आनंदात आहे. ‘राजा शिवाजी’ सिनेमात आर्य कोणती भूमिका साकारणार? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. ‘राजा शिवाजी’ सिनेमा १ मे २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.

