मुंबई : प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमध्ये अजित पवारांच्या उमेदवाराचा पराभव करत राजू खरे निवडून आले. मात्र, राजू खरे निवडून आल्यापासून त्यांची जवळीक ही एकनाथ शिंदे यांच्या पक्षासोबत दिसून येत आहे. तर, काही दिवसांपूर्वी अजित पवारांसोबतही त्यांच्या जाहिराती झळकल्या होत्या, त्यावरून आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आमदार राजू खरेंबाबत नाराजी असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीने घवघवीत यश मिळवले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला विधानसभा निवडणुकीत म्हणावे तसे यश मिळाले नाही. शरद पवारांचे केवळ १० आमदार विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी राजू खरे यांना देणे ही आमची चूक होती, असे म्हणत पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून त्या उमेदवारीबाबत माफी मागण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मोहोळ विधानसभा मतदारसंघातील पदाधिका-यांनी देखील राजू खरे यांच्याबाबत नाराजी व्यक्त करत त्यांच्या उमेदवारीबाबत माफी मागितली. मागील काही दिवसांपासून सातत्याने राजू खरे पक्षविरोधी कृती करत असून त्यांच्याकडे आता पक्षाकडून पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दिली.
आमदार राजू खरे सध्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा उघडपणे प्रचार करताना पाहायला मिळत आहेत. त्यावर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त करत तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यामुळे, आता पक्षाकडूनच अशी प्रतिक्रिया आल्यानंतर आता राजू खरे काय निर्णय घेतात हे पाहावे लागेल. मात्र, राजू खरेंना दुस-या पक्षात जायचे असल्यास पक्षांतर बंदी कायद्यान्वये अगोदर आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल.