नागपूर : प्रतिनिधी
तांत्रिक कारणांमुळे ग्रामीण भागातील पंपांना डिझेलचा पुरवठा कमी केला जात असल्याने ट्रॅक्टर मालकांना पुरेसे डिझेल मिळेनासे झाले आहे. सध्या पेट्रोल पंपांवर मिळणा-या डिझेलमध्ये तीन ते चार तास मशागतीची कामे करणे शक्य नसल्याचे ट्रॅक्टर मालकांनी सांगितले. परिणामी, पावसाळा तोंडावर असताना डिझेलअभावी शेतातील खरीप हंगामपूर्व मशागतीची कामे ठप्प झाल्याने शेतक-यांवरील संकट गडद होत चालल्याचे चित्र आहे.
आज घडीला बहुतांश शेतकरी ट्रॅक्टर व पॉवर टिलरच्या मदतीने शेतीची कामे करवून घेतात. ग्रामीण भागातील पेट्रोल पंपमालकांनी ट्रॅक्टरमालकांना ११ मेपासून रोज १० ते १५ लिटरपेक्षा अधिक डिझेल देणे बंद केले आहे. त्यामुळे मिळणा-या या डिझेलमध्ये तीन ते चार तास नांगरटी किंवा वखरणी करणे शक्य होत नसून, उर्वरित २० ते २१ तास ट्रॅक्टर काम बंद करून केवळ उभा करून ठेवावा लागत आहे.
तेल कंपन्यांनी डिझेलच्या विक्रीवर नियंत्रण आणले आहे. २०० लिटरपेक्षा जास्त डिझेल विक्री होत असल्यास पंप आपोआपच लॉक केला जात आहे. त्यामुळे टॅक्टरसह मालवाहू वाहनांना पुरेसे इंधन मिळत नसल्याने याचा फटका शेतातील उन्हाळी कामांना बसत आहे. कोल्हापूर, सातारा, तसेच कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग शहरात पुरवठा सुरळीत सुरू होता. काही पंपांवर ठराविक रकमेचेच पेट्रोल-डिझेल दिले जात होते.
गडचिरोली, सांगली येथे समस्या गंभीर
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या १० ते १५ दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेल टंचाईची समस्या गंभीर बनली असून, अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र शहरी भागात दिसून आले. सांगली जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलसाठी पंपांवर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. काही पंपांवर इंधनसाठा संपुष्टात आला असून अनेक पंपांवर जेमतेम साठा आहे. सांगली-मिरजेतील पंपांवर गेल्या चार दिवसांपासून दररोज वाहनचालकांची गर्दी होत आहे
नाशकातही टंचाईचे सावट
शहरात पेट्रोल व डिझेलचा कोणताही तुटवडा नसल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात पेट्रोल पंपांवरील परिस्थिती मात्र पूर्णपणे वेगळी दिसून येत आहे. शहरातील त्र्यंबक रोड, वडाळा रोड, पंचवटी, सातपूर, सिडको आदी भागांतील अनेक पेट्रोल पंपांवर मंगळवारीही (दि. १९) डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या लांबलचक रांगा लागलेल्या दिसल्या. काही पेट्रोल पंपांवर ‘डिझेल उपलब्ध नाही’ अशा पाट्या लावण्यात आल्याने वाहनधारकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये हाल बेहाल
शहर व जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर ‘नो स्टॉक’ चे फलक झळकत असल्यामुळे नागरिकांचे ८० दिवसांपासून हाल होत आहेत. पंपांवर वाहनांच्या रांगाच रांगा सध्या दिसत आहेत. शहर व ग्रामीण भागात एका दिवसात ६ लाख ४८ हजार लिटर पेट्रोल तर ११ लाख ४८ हजार लिटर डिझेलची विक्री शहर व ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवर झाली.
अकोल्यात टंचाईच्या चर्चेने साठवणूक
शहरासह पातूर परिसरातील पेट्रोल पंपांवर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. वाहनांमध्ये इंधन भरण्यासोबतच अनेकजण प्लास्टिक कॅन, ड्रम व इतर कंटेनरमध्ये डिझेल साठवून ठेवत असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक पेट्रोल पंपांवर पहाटेपासूनच वाहनांच्या रांगा लागत आहेत. वाशिममध्ये डिझेलसाठी सकाळपासून रांगा लावत असून, काही ठिकाणी कॅन ठेवून क्रमांक लावले जात आहेत. ट्रॅक्टर, मालवाहू वाहनधारकांना या परिस्थितीचा फटका बसत आहे.
बुलडाण्यात डिझेल पुरवठ्यावर मर्यादा
जिल्ह्यात सिंदखेडराजा तालुक्यासह काही भागांत ट्रॅक्टरला मर्यादित डिझेल दिले जात असल्याने ग्रामीण भागात अस्वस्थता वाढत आहे. अनेक पंपांवर वाहनधारकांना केवळ एक ते दोन हजार रुपयांपर्यंतच डिझेल दिले जात आहे. त्यामुळे ट्रॅक्टर, मालवाहतूक आणि कृषी यंत्रसामग्रीच्या कामांवर परिणाम होत आहे.
















