मुंबई : प्रतिनिधी
राज्यभरात उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. अवघ्या आठ दिवसांपूर्वी राज्यातील केवळ सहा जिल्हे आणि २ तालुक्यांत तापमानाचा पारा ४५ अंशांच्या पुढे होता. आता मात्र राज्यातील एकूण २२ जिल्हे आणि तब्बल १८३ तालुके उन्हाच्या तडाख्यात सापडले असून, येथील तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. राज्य मंत्रिमंडळासमोर सादरीकरणातून ही बाब समोर आली आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारच्या बैठकीत आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडून राज्यभरातील तापमानाची बदलती स्थिती, अवकाळी पाऊस आणि वीज कोसळून झालेल्या जीवितहानीबाबत सादरीकरण करण्यात आले.
७ मे या दिवशीचा एकमेव अपवाद वगळता दररोज विविध जिल्हे आणि तालुक्यांतील पारा वाढून ४५ अंशांच्या पुढे जात असल्याचे निदर्शनास आले आहे. सोमवार, ११ मे रोजी १६ जिल्ह्यांतील ५१ तालुक्यांत पारा ४५ अंशांवर पोहोचला होता. त्यानंतर सलग दोन दिवस १०६ आणि १८३ तालुक्यांतील तापमानाचा पारा वाढलेला असून, ४५ च्या पुढे गेला आहे.
दरम्यान, या ‘हीट वेव्ह’चा सामना करण्यासाठी प्रशासनाने अलर्ट जारी केल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, या काळात वीज कोसळून दहा लोकांसह २७ प्राणी दगावल्याचीही माहिती देण्यात आली.
३ हजार २८ धरणांत ५०३.७६ टीएमसी पाणीसाठा
राज्यातील सहा महसुली विभागांतील एकूण ३ हजार २८ धरणांत ५०३.७६ टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा म्हणजे ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी ३० टक्के पाणीसाठा होता. मोठ्या, मध्यम आणि लघू प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठादेखील मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त आहे. हीच स्थिती राज्यातील १२ मोठ्या धरणांतील पाणीसाठ्याबाबत आहे. मात्र, यंदा उन्हाची तीव्रता जास्त असून, ‘अल निनो’मुळे पाऊस लांबण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे पाणी काटकसरीने वापरण्याची आवश्यकता आहे.
….
















