मुंबई : अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर मान्सूनने मुंबईसह महाराष्ट्रात हजेरी लावली. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई-विरार, पालघर, रायगड असे सर्वच जिल्ह्यात पावसाने मंगळवार सकाळपासून दमदार हजेरी लावली. इतके दिवस इतर ठिकाणी पाऊस पडत असताना मुंबई कोरडी होती, पण आज अखेर मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या.
मुंबई, उपनगरे आणि आसपासच्या जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्यास सुरूवात झाली. पुढील २४ ते ४८ तासांसाठी मुंबईत हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. राज्यात मोसमी पाऊस सक्रिय होण्यासाठी अनुकूल स्थिती असून २४ ते २७ जून दरम्यान कोकण किनारपट्टीसह राज्यातील अंतर्गत भागातील काही प्रदेशात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुणे, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यभरात जोर वाढला
मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या पुण्यात तुफानी पाऊस बरसला. जुन्नर तालुक्यातील कुमशेत परिसरात मुसळधार पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे रस्ते, ओढे आणि नाले दुथडी भरून वाहताना दिसले. काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. वैजापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे गळमोडी नदीला पूर आला. छोटा पूल नदीच्या पुरात वाहून गेला. यामुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबल्याचे दिसले. जालना शहरासह परिसरातही आज दमदार पावसाने हजेरी लावली. सर्वत्र पाणीटंचाईची समस्या तीव्र होत असताना पावसाने हजेरी लावल्यामुळे सारेच सुखावले असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
















