मुंबई : प्रतिनिधी
देशासह राज्यभरात दिवाळीच्या चैतन्यदायी पर्वानिमित्त सर्वत्र उत्साह आहे. मोठ्या शहरांपासून गावखेड्यापर्यंत बाजारपेठा गजबजल्या आहेत. अतिवृष्टीने गेलेली पीके,लांबलेली खरीप काढणी, होऊ घातलेली रबी पेरणी एकाच टप्प्यात आल्याने शेतक-यांची अजूनही शिवारातच लगबग सुरू आहे. पावसाने पिकांचे नुकसान केले असले, तरी दिवाळी सण सर्वांसाठी प्रकाशमय असावे यासाठी शेतकरी व सर्वसामान्य उत्साहाने सणाची तयारी करत आहे.
दिवाळीच्या मुहूर्तावर कपडे, सोने, वाहने, धार्मिक पूजा साहित्य खरेदीसाठी बाजारपेठांत ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. ग्राहकांनी दुकाने गजबजली आहेत. वर्षभराच्या नोंदीसाठी व्यापा-यांना लागणा-या चोपड्या, पूजेसाठी फुले, उसाचे धाट, केळीचे खुंट, लक्ष्मीची प्रतिमा-पावले आदी पूजेचे साहित्य खरेदी करत लक्ष्मी पूजन, पाडवा सणासाठी नागरिकांसह व्यापारी, संस्था, कंपन्या सज्ज झाल्या आहेत. वाहन खरेदीसाठी देखील दुचाकी, चारचाकींसह ट्रॅक्टर, अवजारे खरेदीसाठी देखील बाजारपेठेत उत्साह आहे. दिवाळ फराळाचे काम संपले असून, सणाचा गोडवा या चवदार पदार्थांनी वाढवला आहे.
ठाण्यात दिवाळीचा जल्लोष
ठाणे शहरात दिवाळी पहाटेनिमित्त विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये जामीनाका परिसरात माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या वतीने सांस्कृतिक संगीत, वाद्य वादन आणि ढोल-ताशा पथकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, ज्याला तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळाला. तर दुसरीकडे, ठाण्यातील तलावपाळी येथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून युवासेना लोकसभा अध्यक्ष नितीन लांडगे यांच्या वतीने दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले.
कैद्यांसाठी दिवाळी पहाटचे आयोजन
साता-यातील जिल्हा कारागृहात बंदिवानांसाठी ‘सप्तसूर फाउंडेशन’च्या माध्यमातून दीपावली पहाट हा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गायकांनी हिंदी-मराठी चित्रपटांमधील गाणी सादर केली. या संगीत-कार्यक्रमाला बंदिवानांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, ज्यामुळे दिवाळीच्या निमित्ताने कारागृहातील वातावरण आनंदी आणि उत्साहाचे बनले.
सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी वेळ वाढवली
दिवाळीनिमित्त सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिराच्या वेळा वाढवण्यात आल्या. २२ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरपर्यंत मंदिर भाविकांना दर्शनासाठी पहाटे ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, रोप-वे ट्रॉलीची सुविधा देखील पहाटे ५ ते रात्री ११.३० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे, जेणेकरून आलेल्या प्रत्येक भाविकाला देवीचे दर्शन घेता येईल.
















