मुंबई : राज्यसभेसाठी भाजपच्या उमेदवारांची नावे ठरली असल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी रात्री झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत १० ते १२ जणांच्या नावावर चर्चा करण्यात आली. रामदास आठवले यांच्यासह अनेक नेत्यांची नावे फायनल करण्यात आली आहेत. ही नावे दिल्लीला पाठवण्यात आली आहेत. ‘वर्षा’ बंगल्यावर भाजपच्या कोअर कमिटीची रात्री बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासह १२ प्रमुख नेते उपस्थित होते.
भाजपच्या कोअर कमिटीची बैठक मंगळवारी रात्री पार पडली. या बैठकीमध्ये अनेक नेत्यांच्या नावांवर चर्चा झाली. राज्यसभेसाठी विनोद तावडे, रामदास आठवले, रावसाहेब दानवे, प्रीतम मुंडे, विजया रहाटकर, धैर्यशील पाटील आणि भागवत कराड यांच्यासह इतर नावांची चर्चा होत आहे. कोअर कमिटीच्या नावांचा प्रस्ताव दिल्लीत चर्चेला जाणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबिन यांची भेट घेऊन या नावांची चर्चा करतील. त्यानंतर नावांवर शिक्कामोर्तब केले जाईल. २८ फेब्रुवारीपर्यंत राज्यसभेची नावे जाहीर केली जाणार आहेत.
रामदास आठवले यांची टर्म संपत आहे. त्यामुळे रामदास आठवले यांना मित्रपक्ष म्हणून भाजपच्या कोट्यातून संधी दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे प्रीतम मुंडे यांच्या जागेवर मागच्या वेळी पंकजा मुंडे या निवडणूक लढल्या होत्या. त्यामुळे प्रीतम मुंडे यांची राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भागवत कराड यांची देखील टर्म संपत आहे त्यामुळे त्यांना देखील पुन्हा संधी देतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
धैर्यशील पाटील, रावसाहेब दानवे यांचा देखील लोकसभा निवडणुकीवेळी पराभव झाला होता. त्यांची नावं देखील राज्यसभेसाठी चर्चेत आहेत. १० ते १२ नावांवर भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली. आता रवींद्र चव्हाण दिल्लीत जाऊन राष्ट्रीय अध्यक्षांची भेट घेऊन चर्चा करतील. त्यानंतर नावं फायनल केली जातील.

