मुंबई : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंत्री आशिष शेलार यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. राज्याचा एक ज्येष्ठ मंत्री जातीयवादावर निवेदन करत असेल तर ते हिताचे नाही, असे शरद पवार म्हणाले. आशिष शेलारांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आणि मनसेवर दुबार मतदारांवरून निशाणा साधला होता. त्यावेळी त्यांनी मुस्लिम दुबार मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर शरद पवारांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
शरद पवार म्हणाले की, या राज्यात सामाजिक ऐक्य कसे राहील याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. विशेषत: सरकारमध्ये जे आहे त्यांची जबाबदारी जास्त आहे. जे राज्य सरकारमधील मंत्री आहेत, एक ज्येष्ठ मंत्री जर धार्मिक आणि जातीय तेढ वाढवण्यासंबंधी वक्तव्य करत असेल तर ते राज्याच्या हिताचे नाही.
मतदारयादीतील घोळ आणि बोगस मतदानावरून गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी आरोपांचे रान उठवले आहे. याच मुद्याला धरून सत्ताधारी भाजपही आता मैदानात उतरल्याचे दिसून आले. कॅबिनेट मंत्री आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषेदत ‘लाव रे तो व्हीडीओ’ म्हणत विरोधकांवर निशाणा साधला.
दुबार मतदारांच्या मुद्यावर मनसे आणि महाविकास आघाडीची भूमिका दुहेरी असल्याचा आरोप शेलारांनी केला. राज ठाकरेंना फक्त मराठी आणि हिंदू दुबार मतदार दिसतो का, मुस्लिम दुबार मतदाराबद्दल तुमची भूमिका वेगळी आहे. हा वोट जिहाद आहे, असा आरोपही शेलारांनी केला. यासोबतच शेलारांनी कर्जत-जामखेड, कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडी मतदारसंघातील दुबार मतदारांवरूनही गंभीर आरोप केले.
मतचोरी होते हे शेलारांना मान्य : काँग्रेस
मतचोरी होते हे आशिष शेलारांनी मान्य केले आहे. त्यामुळे आता बोगस मतदारांबद्दल मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना माहिती दिली पाहिजे. यासाठी आमचं नेतृत्व आशिष शेलारांनी करावं असा टोला काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी लगावला.
सगळ्याच दुबार मतदारांवर आक्षेप : मनसे
राज ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांवरून मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी प्रत्युत्तर दिले आहे. आशिष शेलार वैफल्यग्रस्त आहेत, चर्चेत येण्यासाठी अशाप्रकारची वक्तव्ये करतात असे संदीप देशपांडे म्हणाले. तसेच आम्ही सगळ्याच दुबार मतदारांवर आक्षेप घेतो, त्यामध्ये जात आणि धर्म पाहत नाही असेही ते म्हणाले.

