मुंबई : प्रतिनिधी
दिल्लीमधील आंदोलनात एकीकडे क्रूर तर दुसरीकडे विकृत असे वर्तन केंद्राच्या आणि राज्याच्या गृह विभागाकडून बघायला मिळाले. जर गृह विभाग असे कृत्य करतो आणि कोणतीच कारवाई होत नाही, त्यावेळी गृहमंत्र्यांच्याच आदेशाने आंदोलकांवर कारवाईसाठी आदेश असेल याची शक्यता नाकारता येत नसल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
नीट आंदोलन व घडामोडींवर बोलताना सपकाळ म्हणाले की, धर्मेंद्र प्रधान यांच्यासह त्यांचे संपूर्ण रॅकेट ‘चक्की पिसिंग’ करेपर्यंत काँग्रेस याचा पाठपुरावा करणार आहे. हे खरेवाले देवेंद्र फडणवीस म्हणतात तसे नाही, असा टोलाही सपकाळ यांनी लगावला आहे. महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री हे अमित शहा हे आहेत, त्यामुळे मंत्रिमंडळात कुणाला घ्यायचे, कुणाला नाही हे सर्व शहा ठरवतात. धोरणात्मक निर्णयांसदर्भात सुद्धा त्यांना माहिती द्यावी लागते. देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधानपदाचे स्वप्न पडत आहे. हिंदी सक्तीच्या आदेशात तेच स्वप्न होते, मोहित कंबोज यांची संपत्ती वाढवण्याचा प्रयत्नसुद्धा त्यासाठी करण्यात आला. प्रधान यांच्यानंतर त्यांच्याइतका पाताळयंत्री कोण आहे.. देवेंद्र फडणवीस यांची तिथे निवड होऊ शकते.
परीक्षेच्या माध्यमातून मोदी सरकारचा मोठा घोटाळा
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पण आता ‘एक देश एक परीक्षा’ या माध्यमातून मोदी सरकारने फार मोठा घोटाळा केला आहे. परीक्षेवर संपूर्ण नियंत्रण मिळवले, स्वत:च्या पसंतीचे अधिकारी त्यावर नेमले. जे लोक शासकीय सेवेत नाहीत, भारत सरकारशी संबंधित नाहीत, शिक्षण विभागाशी संबंधित नाहीत अशा लोकांना तिथे पाठवले आणि परीक्षेवर असे नियंत्रण मिळवले असे रॅकेट धर्मेंद्र प्रधान यांच्या माध्यमातून राबवल्या गेले. यात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असा आरोप सपकाळ यांनी केला आहे.
जनतेचा पैसा पक्ष फोडण्यात खर्ची
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, गेल्या ९ वर्षांपासून राहुल गांधी विद्यार्थ्यांशी चर्चा करत आहेत. २०२१ पासून राहुल गांधी ‘जेन झी’सोबत चर्चा करत आहेत. या परीक्षेत पारदर्शकता आणल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही ही काँग्रेसची भूमिका होती. केंद्र सरकारचे ५ विभाग आहेत. त्यांचे बजेट पालक खर्च करतात त्यांचा एक हिस्सा थेट भाजपला मिळतो. या पैशातून भाजप पक्ष फोडण्याचे आणि आमदार-खासदार विकत घेण्याचे काम करतो.
















