मुंबई : प्रतिनिधी
भाजपचे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. मुख्यमंत्रिपदाच्या एकूण कार्यकाळाबाबतीत देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांना मागे टाकले आहे. २३ जुलै २०२६ पर्यंत फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ २४३० दिवस म्हणजेच सुमारे ६ वर्ष ७ महिने इतका झाला आहे. शरद पवार यांना (२,४१२) मागे टाकत फडणवीस आता राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांच्या यादीत तिस-या स्थानावर पोहोचले आहेत. त्यांचा कार्यकाळ अद्याप सुरू असल्याने हा विक्रम दररोज वाढत आहे.
फडणवीस तीनवेळा तर शरद पवार चारवेळा मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस हे आतापर्यंत तीन वेळा मुख्यमंत्री झाले आहेत. २०१४ ते २०१९ या कालावधीत सलग पाच वर्षांचा होता. २०१९ मध्ये त्यांनी दुस-यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पण, त्यावेळी तो कार्यकाळ अवघ्या ६ दिवसांत संपुष्टात आला. त्यानंतर, डिसेंबर २०२४ त्यांनी तिस-यांदा मुख्यमंत्रिपदाचीधुरा सांभाळली. १२ जुलै २०२६ पर्यंत या तिस-या कार्यकाळाला ५८५ दिवस पूर्ण झाले असून तो अद्याप सुरू आहे. विशेष म्हणजे, शरद पवार ४ वेळा मुख्यमंत्री झाले. पण, त्यांना एकदाही पूर्ण ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. त्यांच्या चारही कार्यकाळांचा शेवट विविध राजकीय आणि प्रशासकीय कारणांमुळे मुदतपूर्व झाला होता.
महाराष्ट्रातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले नेते
दिवंगत वसंतराव नाईक हे याबाबतीत अव्वल स्थानावर आहेत. त्यांनी ४,०९६ दिवस मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कार्यभार सांभाळला आहे. त्यांनी ५ डिसेंबर १९६३ ते २० फेब्रुवारी १९७५ या प्रदीर्घ कालावधीत राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. तसेच, त्यानंतर २,६८६ दिवसांसह दिवंगत विलासराव देशमुख हे दुस-या स्थानावर आहेत. त्यांनी दोनवेळा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. पहिल्यांदा १८ ऑक्टोबर १९९९ ते १६ जानेवारी २००३ तर दुस-यांदा १ नोव्हेंबर २००४ ते ४ डिसेंबर २००८ या कालावधीत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे.
















