राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली घोषणा
मुंबई : प्रतिनिधी
तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर तेलंगणाच्या राज्यपालपदी हिमाचल प्रदेशची जबाबदारी असलेल्या शिव प्रताप शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी जिष्णू देव वर्मा यांच्या नावाची घोषणा केली. ईशान्य भारतातील अनुभवी राजकारणी म्हणून ओळखल्या जाणा-या जिष्णू देव वर्मा यांनी त्रिपुरा राज्याच्या राजकारणात दीर्घकाळ महत्त्वाची भूमिका बजावली.
त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित असलेले जिष्णू देव वर्मा हे भाजपचे ज्येष्ठ नेते मानले जातात. २०१८ ते २०२३ या कालावधीत त्यांनी त्रिपुराचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करत राज्याच्या वित्त, ऊर्जा आणि ग्रामीण विकासासारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली होती. २०१८ मध्ये त्रिपुरात भाजप सत्तेत आल्यानंतर जिष्णू देव वर्मा यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. त्या काळात त्यांनी वित्त, ऊर्जा, नियोजन, पंचायत राज आणि ग्रामीण विकास यांसारख्या विभागांचे नेतृत्व केले. राजकारणातील दीर्घ अनुभव लक्षात घेऊन त्यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. आधी त्यांनी तेलंगणाचे राज्यपाल म्हणून काम पाहिले. त्यानंतर त्यांची आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली.

