नवी दिल्ली/वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
भारत आणि अमेरिकेतील व्यापार तणाव आता आणखी तीव्र होणार आहे. अमेरिका ही भारताची सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ आहे. भारताच्या एकूण निर्यातीपैकी जवळपास २० टक्के माल अमेरिकेला जातो; पण शुल्कवाढीमुळे भारतीय उत्पादने इतर देशांच्या तुलनेत महाग होतील. विशेषत: व्हिएतनाम, बांगलादेश आणि मेक्सिकोच्या तुलनेत. त्यामुळे भारतीय माल मागे पडण्याची शक्यता आहे.
१२ लाख रोजगारांना फटका : अमेरिकेने भारतीय वस्तूंवर टॅरिफ लावल्यामुळे महाराष्ट्रातील निर्यातधारित उद्योगांना मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. विशेषत: रत्ने-दागिने, वस्त्र, सीफूड आणि लेदर उद्योगांवर याचा परिणाम होणार आहे. मुंबईतील दागिने निर्यात केंद्र, सोलापूर-इचलकरंजीतील कापड उद्योग, कोकणातील सीफूड निर्यात तसेच कोल्हापूरसह लेदर उद्योग अमेरिकन बाजारावर अवलंबून आहेत. राज्यातील तब्बल दहा ते बारा लाख रोजगारांना या निर्णयाचा थेट धोका निर्माण झाला आहे.
पुढे काय होऊ शकते? : टॅरिफ दीर्घकाळ राहिले, तर इंजिनिअरिंग वस्तू, चामडे, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन निर्मिती या क्षेत्रांवरही परिणाम होईल. भारताची अमेरिकेतील निर्यात ४० ते ५० टक्क्यांपर्यंत घटू शकते, ज्यामुळे परकीय चलनाचा साठा कमी होईल.
टॅरिफ बॉम्बमुळे राज्ये चिंतित : अमेरिकेचा ५० टक्के आयात कर (टॅरिफ) लागू होत असून, त्याचा किती परिणाम निर्यातीवर होतो, या प्रश्नाने राज्य सरकारे चिंतित असल्याचे दिसून येत आहे. अनेक राज्यांनी संभाव्य हानीचा आढावा घेणे सुरू केले असून, पर्याय म्हणून नवीन बाजारांचा शोध सुरू केला आहे.
















