25.3 C
Latur
Saturday, November 8, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यातील ३८ हजार कंत्राटी कर्मचा-यांचे मानधन थकित!

राज्यातील ३८ हजार कंत्राटी कर्मचा-यांचे मानधन थकित!

सातारा : प्रतिनिधी
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी अधिकारी आणि कर्मचा-यांना मागील दोन महिन्यांचे मानधन मिळालेले नाही. राज्यातील अशा कर्मचा-यांची संख्या ३८ हजारांवर आहे. यामुळे या कर्मचा-यांच्या दिवाळी सणावर दु:खाचे सावट निर्माण झाले आहे. त्याचबरोबर थकित मानधनासाठी तातडीने जिल्हास्तरावर अखर्चित असणारा १५ वा वित्त आयोगाचा निधी वापरण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी संघटनेकडून आरोग्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकता संघाच्या वतीने मागील आठवड्यातच आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन देण्यात आले होते. त्यामध्ये म्हटले आहे की, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नवीन ई स्पर्श संगणक प्रणाली कार्यरत करण्याची कार्यवाही राज्यस्तरावरून सुरू करण्यात आली आहे. मात्र, ही संगणक प्रणाली दिवाळीपर्यंत कार्यान्वित होणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही.

त्यातच या अभियानांतर्गत राज्यातील कंत्राटी कर्मचा-यांचे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे मानधन थकित आहे. हे मानधन दिवाळीपूर्वी कर्मचा-यांना मिळणे आवश्यक आहे. त्यातच प्रत्येक जिल्ह्यात १५ वा वित्त आयोगाचा पुरेसा निधी शिल्लक आहे. त्यामुळे कर्मचा-यांचा दिवाळी सण, बँक कर्ज हप्ते, दैनंदिन घरगुती तसेच शैक्षणिक खर्चही आहे. हे विचारात घेऊन कर्मचा-यांच्या मानधनासाठी तातडीने १५ वा वित्त आयोग निधी वापरण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR