मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात उत्पादित डाळिंबाच्या हंगामातील पहिला कंटेनर मुंबईतील जेएनपीटी बंदरातून समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना करण्यात आला आहे. कृषी पणन मंडळाच्या वाशी, नवी मुंबई येथील विकिरण सुविधा केंद्रावरून हा कंटेनर रवाना करण्यात आला असून राज्यातील फळ निर्यातीच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, अशी माहिती पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
चालू २०२५-२६ हंगामात अमेरिकेस सुमारे ३०० मेट्रिक टन डाळिंब निर्यातीचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी दिली. अमेरिकेतील बाजारपेठेत डाळिंबाची मागणी झपाट्याने वाढत असून, तेथील डाळिंब बाजारपेठ सध्या अंदाजे १.२ ते १.५ अब्ज अमेरिकी डॉलर इतकी आहे. विशेषत: भारतीय ‘भगवा’ व ‘सुपर भगवा’ जातींना चव, रंग व साखर-आम्ल संतुलनामुळे अधिक मागणी आहे. तसेच भारतीय डाळिंबांचा अमेरिकन बाजारपेठेतील वाटा वाढल्यास राज्यातील डाळिंब उत्पादक शेतक-यांचे उत्पन्न २० ते ३० टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
अमेरिकेसाठी जेएनपीटी बंदरातून हंगामातील पहिला डाळिंब कंटेनर रवाना होणे हे राज्याच्या कृषी-निर्यात क्षमतेसाठी तसेच शेतक-यांना उत्पन्नवाढीच्या दृष्टीने प्रोत्साहित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. येणा-या काळात निर्यात सुविधा केंद्रातून मोठ्या क्षमतेने डाळिंब निर्यात केले जाणार आहेत, असे पणनमंत्री जयकुमार रावल म्हणाले.

