मुंबई ठाण्यासह मराठवाडा, विदर्भ, कोकणात हजेरी
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील ठाणे जिल्ह्यासह कल्याण-डोंबिवली, नाशिक, नंदूरबार, विदर्भात सोसाट्याच्या वा-यासह पावसाने थैमान घातल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. मराठवाड्यातही काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. ठिकठिकाणी घरांचे पत्रे उडाले. यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड तालुक्यातील दराटी येथे वीज पडून शेतक-याचा मृत्यू झाला तर २ जण जखमी झाले. त्यांना नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे उपचारासाठी दाखल केले.
कल्याण-डोंबिवलीत जोरदार पावसाने घरांचे पत्रे उडून रस्त्यावर आल्याची घटना घडली. तसेच अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत. झाडाची मोठी फांदी कोसळून तीन दुचाकी गाड्यांचे नुकसान झाल्याची घटना कल्याण पश्चिमेत साई शरणम गृहसंकुलात घडली. नंदुरबार जिल्ह्यात सलग तिस-या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी लावली असून धडगाव तालुक्यातील काकडदा आणि खामला परिसरात आज मुसळधार पाऊस झाला. वादळी वा-यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप आले.
यासोबतच तोरणमाळला जोरदार पावसाने हजेरी लावली. इगतपुरी तालुक्यात सतत दुस-या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. तिकडे पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा तालुक्यात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. तसेच अमरावती, यवतमाळ जिल्ह्यातही वादळी वा-यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अमरावती शहरासह ग्रामीण भागात तिवसा, मोर्शी तालुक्यात वादळी वा-यासह पाऊस झाला. यामुळे कांदा, तीळ आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. यवतमाळ जिल्ह्यातही अवकाळी पावसाचा पिकांना फटका बसला. कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झाला. महाडमध्येही वादळी वा-यासह पावसाने हजेरी लावली.
मराठवाड्यातही हजेरी
मराठवाड्यातही नांदेड जिल्ह्यातील काही ठिकाणी आज दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात हदगाव, हिमायतनगर भागात वादळी वा-यासह मोठा पाऊस झाला. बीड तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील वडगाव कळसंबर परिसरात झेंडूच्या शेतीचे नुकसान झाले. तसेच शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले. धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातही काही ठिकाणी अवकाळीने हजेरी लावली.
















