27.2 C
Latur
Saturday, March 7, 2026
Homeमहाराष्ट्रराज्यात उष्णतेचा तडाखा!

राज्यात उष्णतेचा तडाखा!

रायगड, रत्नागिरीमध्ये ‘यलो अ‍ॅलर्ट’

मुंबई : प्रतिनिधी
राज्यभरात सध्या उष्णतेचा पारा सातत्याने वाढताना दिसत आहे. हिवाळा संपत आला असून आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. सध्या सकाळच्या वेळेस उष्णता जाणवत असली, तरी रात्री थंडीचा अनुभव येत आहे. मात्र, दिवसेंदिवस उष्णतेत वाढ होत आहे. दुपारच्या वेळेस घराबाहेर पडणेही कठीण होत चालले आहे. तापमानात सतत चढ-उतार पाहायला मिळत आहेत.या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागने सोमवारी १६ फेब्रुवारी रोजी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

मुंबई शहरात सोमवारीही उष्णतेचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता असून, कमाल तापमान सुमारे ३४ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुपारनंतर अथवा संध्याकाळच्या सुमारास आकाशात काही प्रमाणात ढगांची चादर दिसू शकते. तसेच १७ फेब्रुवारी रोजीदेखील वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, शहरातील वाढलेल्या आर्द्रतेमुळे रात्रीच्या वेळचे तापमानही अपेक्षेपेक्षा अधिक नोंदले जात आहे.

आतापासूनच उष्णतेचा त्रास इतका जाणवत असेल, तर मे महिन्यात परिस्थिती कशी असेल, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी उष्णतेची तीव्रता जाणवली. येथे कमाल तापमान ३४.७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले, जे नेहमीपेक्षा सुमारे ३.१ अंशांनी अधिक होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR