Homeमहाराष्ट्रराज्यात कुठे उष्णतेची लाट तर कुठे अवकाळी तडाखा!

राज्यात कुठे उष्णतेची लाट तर कुठे अवकाळी तडाखा!

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात विदर्भासह मराठवाड्यातही उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. अकोला, वाशिम जिल्ह्यात तापमानाने ४२ अंश सेल्सियसचा टप्पा पार केला आहे. मात्र, दुसरीकडे अवकाळीमुळे काही ठिकाणी वातावरणात बदल झाल्याचे चित्र आहे. तरीही हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील ३-४ दिवसांत उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात उष्णतेची लाट तीव्र राहणार असून त्याचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवणार आहे. गेल्या २४ तासांत देशातील अनेक भागांप्रमाणेच महाराष्ट्रातही उष्णतेची तीव्रता कायम आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात तापमान ४० अंशांच्या वर पोहोचल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात २५ एप्रिल रोजीही विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर विदर्भात २८ एप्रिल रोजी वादळी वा-यासह पावसाचा अंदाज आहे. तसेच कोकण आणि गोव्यात २४ एप्रिल रोजी काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. वादळी वा-यांचा वेग ३० ते ५० किमी प्रतितास राहू शकतो. त्यामुळे शेती व झाडांना काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील अनेक भागात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता असून उष्णतेमुळे नागरिकांना त्रास होऊ शकतो. विशेषत: विदर्भ आणि मराठवाड्यात उकाडा अधिक जाणवेल, असा अंदाज केंद्रीय हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने शेतक-यांनाही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार पिकांना सकाळी किंवा संध्याकाळी हलके पाणी द्यावे, जमिनीत ओलावा टिकवण्यासाठी मल्चिंगचा वापर करावा. नव्या लागवडीवर सावलीसाठी जाळी वापरावे, असे सूचवण्यात आले आहे. दरम्यान, वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांनाही अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.

महाराष्ट्र राज्य लहरी
हवामानाच्या विळख्यात
महाराष्ट्र सध्या लहरी हवामानाच्या तडाख्यात सापडला आहे. कुठे पाऊस सुरू आहे तर कुठे जीवघेणा उकाडा. या विचित्र परिस्थितीमुळे राज्यातील जनता हवालदिल झाली आहे. आज सकाळी कोकणात धुवांधार पाऊस झाला. दुपारनंतर कर्नाटकात बिदर जिल्ह्यातील महाराष्ट्राच्या सीमेलगतही जोरदार पाऊस झाला तर दुसरीकडे विदर्भ, मराठवाड्यात रखरखीत उन्हाने लोकांना चांगलेच भाजून काढले आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

दुपारच्या वेळी घराबाहेर
पडणे टाळण्याचे आवाहन
नागरिकांनी शक्यतो दुपारच्या उन्हात बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी आणि द्रवपदार्थ घ्यावेत, हलके, सैल कपडे वापरावेत, असे हवामान विभागाने म्हटले आहे. तसेच हवामान विभागाने उष्णतेबरोबरच वादळी पावसाच्या शक्यतेमुळेही नागरिक आणि शेतक-यांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR