मुंबई : प्रतिनिधी
राज्यात खरीप हंगामाची तयारी सुरू असताना राज्यात ठिकठिकाणी खतटंचाईमुळे गोंधळ निर्माण झाला आहे.
यंदा अनेक भागांतील शेतकरी आधीच अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा सामना करत आहेत. त्यात आता खरीप पेरणीपूर्वीच युरियाची कमतरता निर्माण झाल्याने शेतक-यांच्या अडचणी वाढल्या आहेत. वेळेत खत न मिळाल्यास पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
शेतकरी आता पावसाळ्यातील पिकांच्या तयारीला लागला आहे. त्यामुळे जमीन नांगरणे, बियाणांसोबतच युरिया आणि डीएपी खत खरेदीसाठी शेतक-यांची धावपळ सुरू झाली आहे. पण खत मिळत नसल्यामुळे शेतक-यांना उन्हाळ्यामध्ये त्रास सहन करावा लागत आहे. युरिया उपलब्धतेच्या मुद्यावर देशातील अनेक राज्यांमध्ये शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि बिहारमध्येही शेतक-यांनी युरिया टंचाई, काळाबाजार आणि खतासोबत इतर उत्पादने खरेदी करण्याची सक्ती होत असल्याच्या आरोपांवरून निदर्शने केली आहेत.
सध्या एका आधार कार्डवर पाच पोती खताचे वितरण केले जात आहे. शेतक-यांची वाढती गर्दी आणि गोंधळ टाळण्यासाठी कृषी सेवा केंद्रांकडून टोकन प्रणालीचा अवलंब करण्यात आला आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर खते आणि बियाणे शेतात नेणे अवघड होत असल्याने अनेक शेतकरी पाऊस सुरू होण्यापूर्वीच खताची खरेदी करून साठा करण्याला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे कृषी सेवा केंद्रांवर सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
पहाटे ४ वाजल्यापासून केंद्राबाहेर रांगा
मिळालेल्या माहितीनुसार,अकोला जिल्ह्यातील एका कृषी सेवा केंद्रावर युरियाचा साठा येणार असल्याची माहिती मिळताच शेतकरी पहाटे ४ वाजल्यापासून केंद्राबाहेर जमा होऊ लागले. युरियाचा मर्यादित साठा उपलब्ध असल्याने शेकडो शेतक-यांनी कृषी सेवा केंद्राबाहेर पहाटेपासूनच रांगा लावल्या.
एका शेतक-याला एकच पोते; वादानंतर गोंधळ
मर्यादित साठा लक्षात घेऊन विक्रेत्याने प्रत्येक शेतक-याला फक्त एकच पोते युरिया देण्याचा निर्णय घेतला. यामुळे अनेक शेतक-यांनी नाराजी व्यक्त केली. काहींनी अधिक खताची मागणी केल्याने विक्रेते आणि शेतक-यांमध्ये वादावादी झाली. परिस्थिती चिघळताच पोलिसांना घटनास्थळी बोलावण्यात आले.
अवकाळी पावसानंतर नवे संकट
अधिका-यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा आणि तालुका स्तरावर पुरेसा युरिया साठा उपलब्ध असल्याचा दावा केला. काही ठिकाणी एकाच वेळी मोठी गर्दी होत असल्याने टंचाई असल्याची भावना निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच खत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
वर्ध्यातही खताचा तुटवडा
फक्त अकोल्यामध्येच नाही तर वर्धा जिल्ह्यातही डीएपी खताचा तुटवडा निर्माण झाला आहे. सद्यस्थितीत युरिया आणि डीएपी खताला मोठी मागणी आहे. आधार लिंक करूनही खताचा साठाच नसल्याची ओरड होत आहे. परळी तालुक्यामध्ये युरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात येत असून शासकीय दरापेक्षा ५० ते १०० रुपये अधिक दिल्यास खत उपलब्ध करून दिले जात आहे.
















