18.4 C
Latur
Friday, December 5, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात थंडीची चाहूल

राज्यात थंडीची चाहूल

अवकाळीपासून सुटका; गारठा वाढणार; जळगाव जिल्ह्यात सकाळी धुक्याची चादर पसरली

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात तापमानात चढ-उतार होत असल्याने पावसाचा जोर हळूहळू कमी होत आहे. कमाल तापमानाचा पारा ३० अंशांच्या वर असून, किमान तापमानाचा पारा २० अंशांच्या खाली येऊ लागला आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. शिवाय समुद्रातील चक्रीवादळाचं संकट हळूहळू ओसरत आहे. पुढील चार ते पाच दिवसांत थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात होईल.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्याने आज कमी-अधिक प्रमाणात पावसाला पोषक वातावरण निर्माण होणार आहे. पुढील काही दिवसांत पाऊस राज्याची रजा घेणार आहे. ईशान्य बंगालच्या उपसागरात बांगलादेशच्या किना-यालगत कमी दाब क्षेत्र सक्रिय आहे. त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वा-यांची स्थिती आहे.

राज्यात ६ नोव्हेंबर रोजी कोकण, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह कमाल व किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. जळगाव जिल्ह्यात थंडीची चाहूल लागली असून आज सकाळी वातावरणात धुकं पाहायला मिळालं.

जळगाव जिल्ह्यावर धुक्याची चादर
शहराने धुक्याची चादर पांघरली होती. त्यामुळे दृश्यमानता १०० मीटरपर्यंत होती. कोल्हे हिल्स, पिंप्राळा, सावखेडा शिवार, गिरणा परिसरात दृश्यमानता ७० मीटरवर होती. जळगाव जिल्ह्यात ६ ते ८ नोव्हेंबरला थंडी तर ८ तारखेनंतर गारठा जाणवेल. किमान तापमान १३ ते १७ तर कमाल तापमान २९ ते ३१ अंश राहील. ६ नोव्हेंबरच्या संध्याकाळपासून हवेत काहीसा कोरडेपणा आणि गारवा जाणवेल परिणामी आर्द्रता देखील घटेल व त्यामुळे थंडीचा जोर हळूहळू वाढेल. थंडीचे आगमन होणार असल्याचे हवामान अभ्यासकांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR