22.2 C
Latur
Monday, January 12, 2026
Homeमहाराष्ट्रराज्यात थंडीची लाट; पुढील १० दिवस हुडहुडी कायम

राज्यात थंडीची लाट; पुढील १० दिवस हुडहुडी कायम

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात सध्या सर्वत्र गारठा वाढला आहे. पुढील दहा दिवस म्हणजे १९ डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रात थंडीचा कडाका जाणवू शकेल, अशी माहिती हवामान विभागाने आज (११ डिसेंबर) दिली. मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्राच्या काही भागात रात्री थंडीची लाट अनुभवास येऊ शकते.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ११ ते १३ डिसेंबर रोजी थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. याचा परिणाम कोकणावरही होऊ शकतो. धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, विदर्भात गोंदिया या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर आणि ईशान्य पट्ट्यातून येणा-या वा-यांनी राज्यात थंडीची लाट आली आहे.

मुंबईमध्ये किमान तापमानाचा पारा बुधवारी १६.७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला असून येत्या काळात तो १५ अंशांपर्यंत उतरू शकते. मात्र दिवसाचे तापमान चढेच आहे. सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३४.१ अंश से. होते. सांताक्रूझ येथे किमान आणि कमाल तापमानामध्ये मोठी तफावत नोंदवली जात आहे. दिवसा उन्हाचा ताप आणि पहाटे गारवा अशी स्थिती आहे.
सांताक्रूझ येथील किमान तापमान बुधवारी राज्यातील दुस-या क्रमांकाचे चढे तापमान होते. त्यामुळे किमान आणि कमाल तापमानात १७.४ अंशांची तफावत होती. सांताक्रूझ येथे पुढील दोन दिवसांमध्ये कमाल तापमान ३२ ते ३३ अंश तर किमान तापमान १५ अंशांपर्यंत खाली असेल. त्यामुळे ही तफावत कायम राहील.

सर्वांत कमी तापमान अहिल्यानगरचे
या वा-यांमुळे बुधवारी अहिल्यानगर येथे राज्यात सर्वांत कमी म्हणजे ७.५ अंश से. तापमानाची नोंद झाली. जळगाव येथे ८, तर पुणे ८.४, नाशिक येथे ८.१ तर नागपूर येथे ८ अंश तापमानाची नोंद झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR