मुंबई : प्रतिनिधी
मुंबई, महाराष्ट्रासह देशभरात पुढील सात दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिले आहे. पुढील एक आठवडा पावसाचा जोर कायम राहणार आहे. आंध्र प्रदेश, ओडिशा येथील किना-यालगत बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. यामुळे महाराष्ट्र, गुजरातमध्ये पुढील सात दिवस मुसळधार पावसाचे राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान विभागाने पुढील सात दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. १६ ते २१ ऑगस्ट दरम्यान कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम मध्य आणि त्या लगतच्या उत्तर-पश्चिम बंगाल खाडी आणि उत्तर आंध्र प्रदेश, दक्षिण ओडिशाच्या किना-या लगतच्या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. १८ आणि १९ ऑगस्टपर्यंत या भागात अशीच स्थिती राहणार असून १९ ऑगस्टला दक्षिण ओडिशा, उत्तर आंध्रप्रदेशच्या किनारी भागात प्रवेश करण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, गोवा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गुजरातमधील सौराष्ट्र येथे आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मध्य भारतावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मध्य महाराष्ट्र, कोकण, मुंबई, मुंबई उपनगर आणि मराठवाड्यातील काही भाग येथे १८, १९ऑगस्ट रोजी जारदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, कोकणातील सर्वच जिल्हे येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर नाशिक, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव आणि लातूर येथेही पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. मराठवाडा आणि खान्देशात मध्यम ते जोरदार स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.

