मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील नागरिकांना दिलासा देणा-या मान्सूनच्या प्रगतीला गेल्या दोन दिवसांपासून ब्रेक लागला आहे. महाराष्ट्रातील मान्सूनचा प्रवास सध्या एकाच भागात थांबला असून, पुढील ३ दिवसांत तो राज्यातील आणखी काही भाग व्यापण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
दरम्यान, पुढील पाच दिवस राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज कोकण, विदर्भासह काही जिल्ह्यांमध्ये तुरळक पाऊस पडण्याची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान शेतकरी राजा अद्यापही मान्सूनच्या प्रतीक्षेत आहे.
सोमवारी मान्सून सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्हे पार करत रत्नागिरी, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांपर्यंत व्यापला होता. मात्र त्यानंतर त्याच्या प्रगतीचा वेग मंदावला आहे. सध्या मान्सूनची सीमा रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे, सोलापूर तसेच कर्नाटकातील कलबुर्गी, आंध्र प्रदेशातील नंद्याल, तामिळनाडूतील चेन्नई आणि पश्चिम बंगालमधील सिलिगुडी परिसरापर्यंत पोचली आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मान्सूनपूर्व सरी आणि हलका पाऊस सुरू असला तरी राज्यातील अनेक भाग अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, हा पाऊस सातत्याने पडणारा नसून काही ठिकाणी तो वादळी किंवा पूर्वमोसमी स्वरूपाचा असल्याचे हवामानतज्ज्ञांनी सांगितले आहे.
राज्यातील उर्वरित भागांमध्ये अंशत: ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज असून, उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेचा त्रास आणखी काही दिवस सहन करावा लागू शकतो.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन ते चार दिवसांत मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्रातील आणखी काही भाग, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, संपूर्ण तामिळनाडू तसेच छत्तीसगड, बिहार, झारखंड आणि ओडिशामध्ये मान्सून पुढे सरकण्याची शक्यता आहे.
















