22.6 C
Latur
Sunday, December 14, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात रबीची पेरणी आठ लाख हेक्टरवर

राज्यात रबीची पेरणी आठ लाख हेक्टरवर

गहू, हरभरा, मक्याची लागवड वाढणार; कृषी विभागाचा अंंदाज

पुणे : राज्यात आतापर्यंत सुमारे आठ लाख हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड झाली असून, ज्वारीची पेरणी सरासरी क्षेत्राच्या २६ टक्क्यांपर्यंत झाली आहे, तर गव्हाची पेरणी केवळ तीन टक्के झाली आहे.
सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता चांगली असल्याने गहू, हरभरा आणि मक्याचे क्षेत्र वाढेल. या हंगामासाठी सरासरी क्षेत्राच्या किमान आठ लाख हेक्टर क्षेत्रावर अधिक पिकांची लागवड होईल, असा अंदाज आहे, अशी माहिती कृषी संचालक रफीक नाईकवडी यांनी दिली.

राज्यात ५७ लाख ८० हजार हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड केली जाते. त्यापैकी सर्वाधिक २५ लाख १६ हजार हेक्टर क्षेत्र एकट्या हरभरा पिकाचे आहे. त्यानंतर रब्बी ज्वारीचे क्षेत्र १४ लाख ९५ हजार हेक्टर इतके आहे, तर गव्हाखालील क्षेत्र ११ लाख ८० हजार हेक्टर आहे. राज्यात यंदा अतिवृष्टीमुळे विहिरी, तलाव, धरणे यांत पाण्याची उपलब्धता तुडुंब असल्याने क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.

त्याबाबत कृषी विभागाचे विस्तार संचालक रफीक नाईकवडी म्हणाले, राज्यात सरासरी ५७ लाख ८० हजार हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी होत असली तरी यंदा पाण्याची उपलब्धता चांगली आहे. त्यामुळे हे क्षेत्र ६५ लाख हेक्टरपर्यंत जाईल, अशी अपेक्षा आहे.

यासाठी अकरा लाख टन सरासरी बियाणांची गरज असते; प्रत्यक्षात १४ लाख टन बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे. खतांची सरासरी आवश्यकता २५ लाख टन असते आणि यंदा ३१ लाख टन खते उपलब्ध करून दिली जाणार आहेत. क्षेत्र वाढ ही मुख्यत्वे गहू, हरभरा आणि मका या पिकांत होण्याची शक्यता आहे. पाण्याची उपलब्धता असल्याने गव्हाच्या क्षेत्रात वाढ होईल. हरभरा पिकातही वाढ अपेक्षित असून, चांगल्या आर्थिक परताव्यामुळे हरभ-याच्या क्षेत्रातही वाढ होण्याचा अंदाज आहे.

ज्वारी किती तारखेपर्यंत पेरता येईल
रब्बी ज्वारी पेरणीसाठी फुले माऊली, फुले अनुराधा, परभणी मोती या वाणांची निवड करावी. एकरी ४ किलोऐवजी ६ किलो बियाणे वापरावे. पेरणीनंतर १५ दिवसांनी विरळणी करून एका ठिकाणी एक रोप ठेवावे व पेरणीनंतर ३ आठवड्यांनी फटीच्या कोळप्याने पहिली कोळपणी करावी. दुस-या पंधरवड्यात खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसल्यास क्विनॉलफॉस २५ ईसी ७५० मिली प्रवाही, ५०० लिटर पाणी हेक्टरी फवारणी करावी. आवश्यकतेनुसार पहिली खुरपणी करावी. पेरणीनंतर ८ आठवड्यांनी दातेरे कोळप्याने दुसरी कोळपणी करावी आणि गरज असल्यास पहिले संरक्षित पाणी द्यावे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR