मुंबई : प्रतिनिधी
नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाचा सहावा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे. राज्यात लहान मुले पळवून नेणारी टोळी कार्यरत आहे, तसेच तरुण मुली देखील गायब होत आहेत, हा विषय अत्यंत गंभीर असून यावर विधिमंडळात चर्चा व्हावी अशी मागणी राज ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून पोस्ट करत केली आहे.
एका अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर विषयाकडे तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे लिहीत आहे. महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढत आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार जरी गेलं तरी हे प्रमाण २०२१ ते २०२४ या काळात जवळपास ३० टक् क्यांनी वाढलं आहे. लहान मुलांना पळवून, नंतर त्यांना कामाला जुंपणा-या, त्यांना भीक मागायला लावणा-या आंतरराज्य टोळ्या तयार झाल्या आहेत. आणि या टोळ्या सर्रास लहान मुले पळवत आहेत आणि यावर सरकार नक्की काय कारवाई करत आहे हेच समजत नाही.
लहान मुले पळवण्याच्या अमुक केसेस दाखल होतात आणि त्यातली इतकी टक्के मुलं परत शोधली जातात आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरूप परत पाठवली जातात अशा आशयाचं सरकारी उत्तर यावर महाराष्ट्राला नको आहे. मुळात एनसीआरबी जे आकडे सांगत आहे ते आकडे म्हणजे किती पालकांनी पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत त्याचा तपशील सांगितला जातो, पण अशा काही हजार तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचत तरी असतील का? आणि समजा मुले पुन्हा सोडवून आणली तरी त्या काळात लहान
मुलांच्या मनावर जो आघात होतो, त्याचं काय?
मुळात मुलं पळवून नेणारी टोळी कार्यरतच कशी होते आणि ती इतक्या राजेरोसपणे काम कशी करते? यावर काहीतरी जबरदस्त कृती करावी असे सरकारला वाटत नाही? आज आपण रस्त्यावर, स्टेशनवर, बसस्टँडवर लहान मुलं भीक मागताना बघतो, ती कोण आहेत? त्यांच्या सोबतची जी माणसं भीक मागत असतात ते खरंच त्यांचे आई-वडील असतात का? याचा तपास किंवा वेळ पडल्यास अगदी डीएनए टेस्ट करावी असे आदेश सरकारला द्यावेसे का वाटत नाहीत? असा प्रश्न देखील त्यांनी सरकारला विचारला आहे.

