मुंबई : प्रतिनिधी
हिमोफिलिया रुग्णांचे ऑनलाईन संकेतस्थळाद्वारे ट्रॅकिंग करून त्यांना देण्यात येणा-या उपचाराची अद्ययावत नोंद ठेवावी तसेच एका महिन्याच्या आत हिमोफिलियासाठी राज्यस्तरीय तज्ज्ञ समिती स्थापन करावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. राज्यातील हिमोफिलिया रुग्णांवरील उपचारासंदर्भात आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी मंत्री आबिटकर यांनी गुजरात, जम्मू-काश्मीर, केरळ, कर्नाटक यासह इतर राज्यांत हिमोफिलिया संदर्भात राबविण्यात येत असलेल्या धोरणांचा अभ्यास करण्याच्या सूचना दिल्या. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) च्या वार्षिक कार्यक्रम कृति आराखड्यात हिमोफिलिया आजारासाठी निधी मिळावा यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले.
राज्यात हिमोफिलिया रुग्णांना तातडीने आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी प्रत्येक जिल्ह्यात डे-केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले असून राज्यात एकूण ५ हजार ४९७ हिमोफिलिया रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या आजाराचे कमी तीव्र, मध्यम तीव्र आणि तीव्र असे वर्गीकरण असून, मध्यम व तीव्र स्वरूपाच्या रुग्णांमध्ये अचानक रक्तस्त्राव होण्याचा धोका अधिक असतो. या रुग्णांना तातडीने निदान, उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी प्रत्येक जिल्ह्यात सामाईक डे-केअर सेंटर अद्ययावत करावीत. तसेच रुग्णांचा डाटा एकत्रित करून या आजाराला प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले.
बैठकीस खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार उमा गिरीश खापरे, आरोग्य विभागाचे सचिव ई. रवींद्रन, आरोग्य विभागाच्या आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, नागरी अभियान आयुक्त डॉ. सुनील भोकरे, संचालक डॉ. विजय कंदेवाड तसेच हिमोफिलिया सोसायटी या संस्थेचे प्रतिनिधी व आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
















