मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला असून अनेक ठिकाणी तापमानाचा पारा घसरला आहे. यामुळे हुडहुडी भरण्यास सुरुवात होत आहे. राज्यात सर्वाधिक थंडी विदर्भात आहे. धुळे, नाशिकमध्ये पारा ५-६ पर्यंत खाली आला आहे. गहू-हरभ-यासाठी ही थंडी फायदेशीर असली तरी, द्राक्ष उत्पादकांना मात्र द्राक्षांना तडे जाण्याची भीती आहे. हवामान विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
राज्यात काही दिवसांपासून थंडीसाह गारवा जाणवायला लागला आहे. जसजसा डिसेंबर महिना पुढे सरकत आहे, तसतसं राज्यातला तापमानाचा पारा खाली सरकताना दिसत असून पुन्हा हुडहुडी भरायला सुरूवात होत आहे. मुंबई-पुण्यातही गारव्याचे वातावरण जाणवायला लागले आहे. मुंबईत ८ डिसेंबरच्या सकाळी ब-यापैकी गारवा जाणवेल, तर पुणेकरांनाही आता त्यांचे स्वेटर्स, जॅकेट्स बाहेर ठेवावे लागणार आहेत.
विदर्भात थंडीची लाट सुरूच आहे, नागपूर, गोंदिया, भंडा-यात पारा १० अंशांपेक्षा कमी आहे. हवामान विभागाच्या इशा-यानुसार ११ डिसेंबरपर्यंत थंडीची लाट कायमच राहिल. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अशातच हवामान विभागाने पूर्व विदर्भासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
मुंबईत पारा १७ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस हीच परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यात धुळ्यात सर्वात कमी ५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गोंदियात ८.२ अंश किमान तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेले किमान तापमान पुढील काही दिवसांत आणखी घसरण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये ८.५ अंश आणि अमरावतीमध्ये ९.२ अंश तापमानाची नोंद झाली आहे. उत्तरेकडून येणा-या थंड वा-यांमुळे पुण्यासह राज्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे.
जळगाव शहरासह जिल्ह्यात ८ ते १२ डिसेंबर दरम्यान किमान तापमान ८ ते ११ अंशांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. उत्तर भारतातून येणारे थंड वारे जोरात मध्य महाराष्ट्राकडे वाहत असल्याने गारठा अधिक वाढल्याचे जाणवते. वातावरण अंधुक किंवा ढगाळ, भौगोलिक भाषेत या स्थितीला ‘हेझ’ म्हणतात. धुके आणि कोरड्या वा-यांमुळे आजपासून पुढील चार दिवस जळगावमधील पारा ८ ते ११ अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
धुळ्यात थंडीचा जोर कायम
धुळ्यात तापमानाचा पारा घसरत आहे. आज धुळ्यात ५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यंदाच्या हंगामातील हे सर्वात नीचांकी तापमान मानलं जात आहे. तापमानात तीव्र घट झाल्यामुळे धुळेकरनाचांगलीच हुडहुडी देखील भरलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून धुळ्याच्या तापमानात लक्षणीय घट झाल्याचे दिसून येत आहे.
यवतमाळ जिल्हा महाबळेश्वरपेक्षा थंडगार
यवतमाळ जिल्ह्यातील तापमान १० अंश सेल्सिअस नोंदविण्यात आला. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरचा पारा १३.२ अंश आहे, त्या तुलनेत यवतमाळ जिल्ह्याचा पारा घसरत आहे आणि जिल्ह्यात हुडहुडी कायम आहे. यंदा जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापर्यंत थंडीच्या दोन ते तीन लाट येणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे.

