22.6 C
Latur
Sunday, December 14, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यावर चक्रीवादळाचे संकट

राज्यावर चक्रीवादळाचे संकट

पावसाच्या इशा-यासह तापमानात घट होण्याचीही शक्यता

मुंबई : प्रतिनिधी
गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील तापमानात आणि सोबतच राज्यातील अनेक भागांतील तापमानात कमालीची वाढ झाली आहे. तर श्रीलंकेच्या किना-यावर आणि लगतच्या बंगालच्या उपसागरावर असलेल्या चक्रीवादळामुळे सध्या राज्यातील हवामानात वेगवेगळे बदल पाहायला मिळत आहेत. दिवसा ढगाळ वातावरण, मध्येच कधी तरी गरमी आणि त्यानंतर थंड हवा यामुळे सध्या लोकांच्या आरोग्यावरही याचा परिणाम पाहायला मिळत आहे. अशातच आता पुढील २४ ते ४८ तासांत चक्रीवादळ भारतात धडकण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आल्याने याचा महाराष्ट्रावर परिणाम होऊ शकतो, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

मुंबई शहरात सकाळी किंचित गारवा असल्याचे जाणवेल. मात्र, दिवस चढत गेल्यानंतर उष्णतेचा जोर वाढेल असा अंदाज आहे. शहरातील किमान तापमान २२ ते २३अंश सेल्सियसच्या आसपास राहील, तर कमाल तापमान ३२ ते ३४ अंशांपर्यंत जाऊ शकते. रात्रीच्या तापमानात लक्षणीय घट नाही. उलट हवेत ओलाव्याचे प्रमाण कमी असल्यामुळे अंगाला बोचरी थंडी जाणवण्याचे प्रमाण कमीच राहणार आहे. दिवसभर आकाश वेळोवेळी स्वच्छ राहण्याचा अंदाज असल्याने सौरकिरणांचा उष्ण परिणाम अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. नवी मुंबई आणि ठाणे ही उपनगरेदेखील मुंबईसारखेच हवामान अनुभवणार आहेत.

देशाच्या काही भागात चक्रीवादळामुळे पावसाचा इशारा देण्यात आला असला तरीही राज्यातील परभणी जिल्ह्यात हुडहुडी जाणवू लागली आहे. राज्यात काही भागांमध्ये २ ते ३ डिसेंबरपर्यंत थंडी कायम राहण्याचा अंदाज आहे. मागील दोन-चार दिवसांपासून मुंबईत दिवसा गरमी आणि रात्री थोड्याफार प्रमाणात थंडी जाणवू लागली आहे. २८ नोव्हेंबर २०२५ रोजी भंडा-यात राज्यातील निचांकी तापमानाची नोंद झाली. भंडा-यात १० अंश तापमान होते. चक्रीवादळाचा परिणाम राज्यातील काही भागात बघायला मिळेल. राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण असून विदर्भातील काही भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR