मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रासह ५ राज्यांवर ‘मोंथा’ चक्रीवादळाचे संकट घोंघावत आहे. मोंथा चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश किना-यावर मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुरू आहे. वाढता धोका पाहता सरकारने पाचही बाधित राज्यांमध्ये २२ एनडीआरएफची पथके तैनात केली आहेत.
आतापर्यंत आंध्र प्रदेश, ओडिशा, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि छत्तीसगडमधील सर्व बाधित भागात एनडीआरएफ पथके तैनात करण्यात आली आहेत.
पुढील २४ तासांच्या आत २८ ऑक्टोबरच्या रात्री आंध्र प्रदेशच्या समुद्रकिना-यावर मछलीपट्टणम आणि कलिंगपट्टणम दरम्यान काकीनाडाजवळ मोंथा चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज आहे. ‘मोंथा’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील विदर्भात २८ ते ३० ऑक्टोबर दरम्यान मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबत घोषणा केली.
चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम, यवतमाळ, भंडारा, गोंदिया आणि नागपूरमधील काही ठिकाणी मुसळधार पाऊस, ढगांचा गडगडाट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हवामान विभागाकडून या भागात ‘यलो’ अलर्ट जारी करण्यात आला आहे.

