लातूर : प्रतिनिधी
गोसावी समाज प्रतिष्ठान, लातूरच्या वतीने गेल्या २८ वर्षांपासून विविध सामाजिक, शैक्षणिक व समाजहिताचे उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून समाजामध्ये विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणा-या समाजबांधवांना ‘राज्य समाजभूषण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच इयत्ता १० वी व १२ वीमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा रविवार दि. १६ ऑगस्ट रोजी भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात,लातूर येथे उत्साहात संपन्न होणार आहे. या सोहळ्यास महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तरी समाजातील जास्तीत जास्त गुणवंत विद्यार्थी,पालक तसेच समाजबांधवांनी या प्रेरणादायी सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन गोसावी समाज प्रतिष्ठान, लातूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
















