लातूर : प्रतिनिधी
निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड येथील सर्व्हे नंबर २१५ मधील डोंगर नियमबा रीत्या भुईसपाट करण्याचे काम सुरु आहे. कोणाच्या आशिर्वादाने हे नियमबा उत्खन्न होत आहे, अशी विचारणा नागरिकांकडून केली जात असून डोंगर भुईसपाट होत असल्यामुळे निसर्गक डोंगराची नासधुस होत आहे. या प्रकरणी दोषी असणा-या संबंधित तहसीलदार, गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी व तलाठी यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी या मागणी करण्यात आली आहे.
रामलिंग मुदगड येथील सर्व्हे नंबर २१५ मधील ७ एकर जागेवर उंच डोंगर अस्तित्वात आहे. असे असतानाही त्या जागेत ८० आर खुली जागा असल्याचे खोटे दाखवून ग्रामपंचायतच्या सरपंचांनी प्रशासनाची व जिल्हाधिका-यांची फसवणूक करण्याचे काम केले आहे. ८० आर ही जागा ३३/११ केव्ही उपकेंद्रासाठी डोंगर पोखरून अनधिकृतपणे खुली करण्याचे काम चालू आहे. जेसीबीच्या सहाय्याने डोंगर पोखरून तेथील मुरूम आणि माती अवैधरित्या विक्री करण्याचे काम सर्रासपणे सुरु आहे. डोंगर पोखरून ही जागा विद्युत उपकेंद्रासाठी मोकळी करण्याचा प्रयत्न चालू आहे.
वास्तविक पाहता ही जागा गायरान असून त्याठिकाणी गावातील गोर गरिबांची गुरे-ढोरे चारण्यासाठी आहे. सध्या गावात गायरानासाठी तेवढीच जागा शिल्लक आहे. ही जागा ३३ / ११ केव्ही उपकेंद्रासाठी भाडेतत्वावर देता येत नाही किंवा विक्रीही करता येत नाही. तरीही शासनाचा नियम धाब्यावर बसवून ८० आर जागेतील डोंगर भुईसपाट करण्याचे काम सुरु आहे. डोंगर पोखरून जागा जमीन लेव्हलला आणून ती जागा आधीपासूनच खुली, मोकळी होती, असे प्रशासनाला दाखविण्याचा प्रयत्न सुरु आहे. यासाठी बनावट ना हरकत प्रमाणपत्र जोडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
















