ाातूर : प्रतिनिधी
पश्चिम आशियातील अस्थिर आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या घोषणा केल्या त्या घोषणांबद्दल राष्ट्रभक्त नागरिकांनी नरेंद्र मोदी यांचा धिक्कार करावा तसेच प्रत्येकाने अनादर, असहकार आंदोलन करावे, असे आवाहन लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभय साळुंके यांनी केले.
पंतप्रधान मोदींनी दोन दिवसांपुर्वी काटकसरीचा सल्ला देत इंधन, तेलाची बचत आणि वर्षभर सोने खरेदी न करण्याबाबत सल्ला दिला. त्याविषयी तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्या अनुषंगाने काँग्रेस भवन येथे दि. १३ मे रोजी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष अभय साळुंके बोलत होते. यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव, माजी उपमहापौर कैलास कांबळे, परिवहन समितीचे सभापती फैसलखान कायमखानी, काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे मोईन खान, सोशल मीडिया सेलचे प्रविण सूर्यवंशी, अॅड. शरद देशमुख यांची उपस्थिती होती.
महान भारत देशाला लाभलेले नॉन बॉयोलॉजिकल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी त्याग करण्याचे आवाहन केले आहे. देशासाठी त्याग करावे लागणार पण त्यागाचे स्वरुप सोने खरेदी करुन नका हे आहे, असे नमुद करुन अभय साळुंके म्हणाले, खाद्य तेल कमी वापरा म्हणे, लाज वाटत नाही, अच्छे दिन हेच का? बेजबाबदार पंतप्रधान मोदींनी स्वत:चे अपयश झाकण्यासाठी केलेला हा नसता उद्योग आहे. देशातील राष्ट्रभक्त नागरिकांनी पंतप्रधान मोदींचा धिक्कार करावा, असे आवाहन केले.
















