Homeमहाराष्ट्रराष्ट्रवादीच्या बॅनरवरून अजित पवार-सुनेत्रा पवारांचा फोटो गायब

राष्ट्रवादीच्या बॅनरवरून अजित पवार-सुनेत्रा पवारांचा फोटो गायब

राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

रायगड : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी रुपाली चाकणकर यांनी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून अशोक खरात प्रकरणावरून सुनील तटकरे यांना लक्ष्य केले जात आहे. तटकरेंवर टीका केली जात असताना रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाच्या बॅनरवरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि दिवंगत अजित पवार यांच्यासह पक्षश्रेष्ठींचे फोटो गायब झाल्याचे समोर आले आहे. या बॅनरवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर पक्षफोडीचे वेगवेगळे आरोप होत आहेत. तटकरेंचा बालेकिल्ला मानल्या जाणा-या रायगडमध्ये बॅनरवरून राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींचे फोटो गायब झाल्याचे दिसत आहे. रायगड जिल्हा परिषद निवडणुकीतील प्रचार सभांच्या बॅनरवर देखील केवळ खासदार सुनील तटकरे यांच्या व्यतिरिक्त कोणाचेही फोटो छापण्यात आले नव्हते.

मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदारसंघांतील इंदापूर येथे नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावरील बॅनरवर खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह स्थानिक नेत्यांचे फोटो लावण्यात आले.
रायगडच्या इंदारपूरमधील या बॅनरवर अजित पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह पक्षश्रेष्ठींचे फोटो लावण्यात आले नाहीत. रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवरून पक्षश्रेष्ठींचे फोटो गायब होत असल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

बॅनरवरील गायब फोटोवरून सुनील तटकरे यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, या बॅनरवरून शरद पवार गट तटकरेंना पुन्हा लक्ष्य करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR