27.2 C
Latur
Saturday, March 7, 2026
Homeमहाराष्ट्रराष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे अमित शहांच्या हातात; संजय राऊत

राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे अमित शहांच्या हातात; संजय राऊत

मुंबई : प्रतिनिधी
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अमित शहा यांच्या हातात गेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सूत्रे देवेंद्र फडणवीस यांच्याही हातात राहिलेली नाहीत, असे खळबळजनक वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केले आहे. सगळं काही अमित शहा यांच्या इच्छेनुसारच होईल. प्रफुल्ल पटेल बोलत आहेत म्हणजे अमित शहाच बोलत आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विलीनीकरण होणार नाही. त्याऐवजी अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच भाजपमध्ये विलीन होईल, राष्ट्रवादीचे सगळे नेते भाजपमध्ये प्रवेश करतील असे मोठे वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केले आहे. प्रफुल्ल पटेल ज्याअर्थी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होऊ नये, असे म्हणत आहेत, त्याअर्थी ही अमित शहा यांची इच्छा आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

विमान अपघातानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर अजित पवारांच्या संशयास्पद मृत्यूविषयी पवार कुटुंबातून हल्ले होत आहेत. रोहित पवार यांनी पुरावे समोर आणले आहेत. त्यावर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी पुराव्यातून प्रत्युत्तर द्यावे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला दहा तोंडे फुटली आहेत. अजित पवार हा एकखांबी तंबू होता. तो कोसळून पडल्यानंतर या तंबूतील उंट, खोडे, बैल यांची धावाधाव सुरू आहे, अशी घणाघाती टीकाही राऊतांनी केली आहे.

कंपनीत अदृश्य हात
विमान अपघाताचा तपास पूर्णपणे होणार नाही, त्यामधून काही निष्कर्ष समोर येणार नाही, असा मोठा दावा देखील संजय राऊतांनी केला आहे. अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते, त्या कंपनीत अदृश्य हात आहेत, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR