मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज (बुधवारी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची, तर युवक प्रदेशाध्यक्षपदी निखिल ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही नवनिर्वाचित पदाधिका-यांना खासदार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नियुक्तीचे पत्र देऊन जबाबदारी सोपवली आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाबाबत मात्र अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.
दरम्यान, महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची निवड अनेक अर्थाने महत्त्वाची ठरली असल्याचे बोलले जात आहे. अशातच गेल्या २६ वर्षांचा हा प्रवास आहे. पंचायत समिती सदस्य, महानंद दूध डेअरी चेअरमन, पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला अध्यक्षपद, असे १४ वर्षे काम करण्याची संधी मिळाली. यापुढची मोठी जबाबदारी समजून काम आता करायला हवे, अशी प्रतिक्रिया वैशाली नागवडे यांनी दिली.
नवनिर्वाचित महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांचा राजकीय प्रवास
महिला प्रदेशाध्यक्षा वैशाली नागवडे यांच्याबद्दल सांगायचे तर ११ फेब्रुवारी १९७३ रोजी जन्मलेल्या नागवडे यांचे शिक्षण बी. कॉम पर्यंत झाले असून त्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळावर संचालक म्हणून आहेत. सोबतच महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ (महानंद) येथेही संचालकपद भूषविले आहे. दौंड पंचायत समिती सदस्याही होत्या.
२००९ ते २०२१ पर्यंत पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली होती.















