मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि एसआयआरच्या मुद्यावरून इंडिया आघाडीने मंगळवारी काढलेल्या ‘लोकशाही वाचवा’ मोर्चाला दिल्ली पोलिसांनी अडवल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी अचानक गनिमीकावा करत आकाशवाणी भवनात घुसून भवनाच्या मागच्या दारातून आयोगाच्या इमारतीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला; पण पोलिसांनी मागच्या दरवाजावरच त्यांना घेरले. त्यानंतर त्यांनी तिथेच बाहेरच्या बाजूला ठिय्या दिला. राहुल गांधी म्हणाले, मला आयुक्तांना भेटून त्यांना सवाल करायचे आहेत; पण ते भेटायला तयार नाहीत. मी आंदोलनासाठी जिथे बसतो तिथून पोलिस मला उठवतात.
आता पोलिसांनीच सांगावे की मी कुठे बसू? इंडिया गेटवर बसू, जंतर मंतरवर बसू की फुटपाथवर बसू? आकाशवाणी भवनापासून केवळ ५० मीटरवर निवडणूक आयोगाची इमारत आहे. अखेर ८ तास ठिय्या दिल्यानंतर रात्री ८ वाजेच्या सुमारास पोलिसांनी राहुल-प्रियंकासह काँग्रेसच्या ५० खासदारांना ताब्यात घेतले आणि २ तासांनंतर त्यांना सोडून दिले. संसद भवनातील मकर द्वारापासून इंडिया आघाडीचा मोर्चा सकाळी ११ वाजता सुरू झाला. हा मोर्चा निवडणूक आयोगाकडे जाणार होता; परंतु पोलिसांनी तो मध्येच अडवल्यानंतर विरोधी पक्षांच्या खासदारांनीही आकाशवाणी भवन परिसरात आंदोलन केले. या आंदोलनात आम आदमी पक्ष आणि द्रमुक मात्र गैरहजर होते. दरम्यान आग्रा येथे ज्ञानेश कुमार यांच्या वडिलोपार्जित घरात त्यांच्या आई सत्यवती यांनी गंगाजल शिंपडून शुद्धीकरणाचा विधी केला.
२८ सप्टेंबर रोजी काँगे्रस कार्यकर्त्यांनी घराबाहेर केलेल्या आंदोलनामुळे घर अपवित्र झाल्याचा दावा त्यांनी केला. सकाळी ११ च्या सुमारास इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसद भवनाच्या मकर द्वारापासून ‘लोकशाही वाचवा’, ‘माझे मत वाचवा’ अशा घोषणा देत निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे जाण्यास सुरुवात केली. सुमारे ३०० खासदार मोर्चात सहभागी होते. या वेळी संसद परिसर आणि निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या मार्गावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ठिकठिकाणी बॅरिकेड उभारले होते. या मोर्चात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी, डेरेक ओब्रायन, उबाठाचे अरविंद सावंत, संजय राऊत, अनिल देसाई यांच्यासह इंडिया आघाडीच्या १९ पक्षांचे खासदार सहभागी झाले होते. राहुल गांधी यांच्या हातात ‘ज्ञानेश इट्स डन ब्रो’ असा फलक होता. मोर्चा रोखल्याबद्दल संताप व्यक्त करताना राहुल म्हणाले, मोर्चात विरोधी पक्षाचे ३०० खासदार आहेत. ते ज्ञानेश कुमारांना भेटू इच्छितात; परंतु आम्हाला रोखण्यात आले. नक्की काय अडचण आहे ते आम्हाला समजत नाही. जर निवडणूक आयोग लोकप्रतिनिधींनाच भेटणार नसेल तर मग लोकशाहीचा अर्थ काय? राहुल गांधी म्हणाले, भाजप काय म्हणते याची मला पर्वा नाही. मी भारताची लोकशाही वाचवण्यासाठी येथे उभा आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा, मोहन भागवत आणि ज्ञानेश कुमार यांनी देशातील लोकशाही संपवली आहे. ‘मतचोरी’ करून देशाचा ताबा घेण्यात आला. त्यासाठी ज्ञानेश कुमारांनी मदत केली.
या सर्वांविरोधात कारवाई होईल, कोणीही वाचणार नाही. जर त्यांनी मतचोरी केली नसती तर ते आम्हाला भेटायला तयार झाले असते. सपा नेते अखिलेश यादव म्हणाले, भाजपचे लोक घाबरले आहेत म्हणूनच सर्वत्र बॅरिकेड लावले आहेत. २०१७ ते २०२४ च्या निवडणुकीत निवडणूक आयोगाने बेईमानी केली. बंगालमध्ये तर खुलेआम खेळ केला. उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकांमध्येही मतांची चोरी कशी झाली ते स्पष्ट आहे. निवडणुकीतील पराभवामुळे काँग्रेस अस्वस्थ झाली आहे, अशी टीका भाजपने केली. निवडणुकांमधील सातत्यपूर्ण पराभवामुळे काँग्रेस निराधार विधाने आणि खोटे दावे करून देशाची दिशाभूल करत आहे, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, भारतातील संवैधानिक संस्थांना बदनाम करणे हा काँग्रेस आणि त्यांना साथ देणा-या इतर पक्षांचा उद्देश आहे. संविधानाने तयार केलेल्या सर्व संस्था कुचकामी असून त्या न्याय देऊ शकत नाहीत, अशी भावना जनतेमध्ये निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. एकदा ही भावना रूजली की पुढे संविधानच न्याय देऊ शकत नाही, असे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
















