मुंजा कंठाळे
बोरी : जिंतूर तालुक्यातील आणि बोरीपासून ७ तर जिंतूरपासून ११ किलोमीटर अंतरावरील रिडज येथील श्री जगदंबा देवीचे जागृत संस्थान सर्वदूर प्रसिद्ध आहे. रिडजची ही देवी तुळजाभवानीचीच प्रतिमा मानली जात असून, जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरील भाविकही मोठ्या संख्येने येथे दर्शनासाठी गर्दी करतात. श्री जगदंबा देवीचे स्थान एका उंच टेकडीवर असून मुख्य रस्त्यापासून गाव २ किलोमीटर आत वसलेले आहे. देवीच्या मूर्तीचे रूप अत्यंत मनमोहक आणि प्रभावी आहे.
तुळजापूरच्या भवानी देवीच्या प्रतिमेसारखीच ही मूर्ती लहान असून अत्यंत जागृत देवी मानली जाते. मंदिरासमोरील भव्य दीपमाळ भाविकांचे लक्ष वेधून घेते. नवरात्रौत्सवानिमित्त येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रामस्थांच्या आख्यायिकेनुसार देवीने एका भक्ताला स्वप्नात दर्शन देऊन माझ्या सभोवती कोणी नाही, माझ्या भोवती राहायला या आणि मला गावाच्या मध्यवस्तीत स्थापन करा, असा आदेश दिला होता. त्यानंतर या ठिकाणी देवीची स्थापना होऊन गाव वसत गेले. पूर्वी अत्यंत लहान असलेले हे मंदिर भक्तांच्या अथक प्रयत्नातून आज भव्य स्वरूपात विकसित झाले असून, ते श्रद्धा आणि भक्तीचे प्रमुख केंद्र बनले आहे. मंदिर बुरुजाच्या रचनेतील असून येथील परिसर अत्यंत सुंदर रीतीने सुशोभित केला आहे.
अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना करून येथे नवरात्रोत्सव अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. या काळात देवीच्या दर्शनासाठी परिसरातील व इतर जिल्ह्यांतील भाविक टेकडीवर पायी चढून येतात. नवमीला होम व विशेष धार्मिक विधी पार पडतात. या देवीला नवस केल्यावर इच्छित फळ मिळते, अशी लोकांची दृढ श्रद्धा असून नवस फेडण्यासाठी भक्त विविध प्रकारे सेवा अर्पण करतात.
नवरात्रोत्सवानिमित्त रिडज येथे १२ ते १८ ऑक्टोबर दरम्यान देवीच्या मंदिर परिसरात अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद् भागवत महापुराण कथा व ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात भागवत कथा प्रवक्ते म्हणून पांडुरंग महाराज भोसेकर सेवा देत आहेत, तर ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ मधुकर महाराज रिडजकर सांभाळत आहेत. दि. १९ रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत नारायण महाराज आर्वीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने या धार्मिक सोहळ्याची सांगता होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमांचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन रिडज ग्रामस्थांच्या वतीने व जगदंबा देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
मुलीच्या कन्यादानात जपली जाते परंपरा
रिडज गावाची एक अनोखी दंतकथा व परंपरा आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात येथील कोणताही गावकरी पलंगावर किंवा गादीवर झोपत नाही. गावातील मुलीच्या लग्नात कन्यादानात गादी दिली जात नाही. नोकरी निमित्ताने बाहेरगावी असलेले गावकरी व भाविकही या परंपरेचे काटेकोर पालन करतात, अशी माहिती संस्थानाचे अध्यक्ष विक्रम खापरे यांनी दिली.
















