लातूर : प्रतिनिधी
रीड लातूर या उपक्रमांतर्गत प्रकट वाचन, निबंध लेखन व काव्यलेखन स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. वाचन संस्कृती जोपासली जावी आणि विद्यार्थ्यांमध्ये भाषिक तसेच सर्जनशील गुणांचा विकास व्हावा या उद्देशाने मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत रीड लातूर उपक्रमाचे संस्थापक सौ. दीपशिखाताई धिरज देशमुख व श्री धिरज विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. रीड लातूर उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी गेल्या ४ वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येत आहे. या स्पर्धेत ३ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.
स्पर्धांचे आयोजन शालेय स्तरावर करण्यात आले. गट १ (इयत्ता १ ते ५), गट २ (इयत्ता ६ ते ८) आणि गट ३ (इयत्ता ९ व १०) अशा तीन गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या. प्रकट वाचन स्पर्धेत लहान गटासाठी परिचित तर मोठ्या गटासाठी अपरिचित उता-यांचे वाचन घेण्यात आले. आवाजातील चढ-उतार, विरामचिन्हांची दखल, वाचनशैली आदी निकषांवर शालेय स्तरावर मूल्यमापन करण्यात आले.
निबंध लेखन स्पर्धेसाठी ‘माझ्या स्वप्नातील गाव’, ‘माझ्या स्वप्नातील शाळा’, ‘मला आवडलेले पुस्तक’, ‘मला आवडलेले कवी अथवा लेखक’, असे विषय देण्यात आले. हस्ताक्षर, आशय मांडणी, कल्पकता व नाविन्य यावर आधारित परीक्षण करण्यात आले. काव्यलेखन स्पर्धेत निसर्ग, परिसर व विद्यार्थ्यांचे भावविश्व या विषयांवर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त कविता सादर केल्या.
स्पर्धा निकोप व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्यातील भाषिक अभिव्यक्ती अधिक बळकट व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले.ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, मुख्याध्यापक, शिक्षक व शालेय व्यवस्थापन समिती यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे उपक्रमाचे समन्वयक राजू सी. पाटील यांनी नमूद केले. स्पर्धेत सहभागी व विजयी सर्व विद्यार्थ्यांचे रीड लातूरतर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.

