रेणापूर : प्रतिनिधी
राजकारण न करता साखर कारखान्याच्या माध्यमातून समाजात साखरेसारखा गोडवा निर्माण करण्याचे काम आम्ही केले आहे. मांजरा परिवारातील साखर कारखाने ही शेतक-यांची मंदिरे असून, ही मंदिरे जपण्याची जबाबदारी ऊस उत्पादक शेतक-यांची आहे, असे सांगून यंदा अत्यल्प पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, चालू व पुढील गळीत हंगाम आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, २०२६-२७ च्या गळीत हंगामात कारखान्याला गाळपासाठी येणा-या उसाला प्रतिटन ३ हजार २०० रुपयांपेक्षा अधिक भाव देण्यात येईल, तर पहिली उचल प्रतिटन ३ हजार रुपये दिली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा रेणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक तथा माजी मंत्री, सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांनी करत कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता, आतापर्यंत मांजरा परिवारातील कारखान्यांना ऊस दिला, तसाच यापुढेही ऊस द्यावा, असे आवाहनही देशमुख यांनी केले.
रेणापूर तालुक्यातील दिलीपनगर निवाडा येथील रेणा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम २०२६-२७ चा २१ वा बॉयलर अग्निप्रदिपन व गळीत हंगाम शुमारंभ घट स्थापनेच्या शुभमुहुर्तावर रविवार दि. ११ ऑक्टोबर रोजी साायंकाळी माजी मंत्री, सहकारमहर्षी देशमुख यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकुन करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी आमदार वैजनाथ शिंदे, मांजरा साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन अशोक काळे, चेअरमन शाम भोसले, आबासाहेब पाटील, यशवंतराव पाटील, सर्जेराव मोरे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, विजय देशमुख, सचिन पाटील, रेणा कारखान्याचे चेअरमन अनंतराव ठाकूर (देशमुख) व उपाध्यक्ष अॅड. प्रवीण पाटील, कार्यकारी संचालक मोरे, कृऊबा चे सभापती उमाकांत खलंग्रे, उपसभापती शेषेराव हाके, जि प च्या गटनेत्या आशाताई भिसे, गंगासिंह कदम, प्रमोद कापसे, नितिन मोटेगावकर यांच्यासह आदि उपस्थित होते.
यावेळी माजी आ. वैजनाथ शिंदे , अशोक काळे, यशवंतराव पाटील यांची भाषणे झाली तर कारखान्याचे चेअरमन अनंतराव (ठाकूर) देशमुख यांनी प्रास्ताविक करताना गतवर्षी कारखान्याचा लेखा जोखा मांडत यावर्षी दुष्काळी परस्थिती असली तरी कारखाना व्यवस्थापन नियोजनबद्ध पद्धतीने गळीत हंगाम २०२६-२७ यशस्वी करून साडेचार ते पाच लाख मॅट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करेल असे त्यांनी सांगितले यावेळी कारखान्याचे तज्ञ संचालक चंद्रचुड चव्हाण, संचालक धनराज देशमुख, संग्राम माटेकर, चंद्रकांत सुर्यवंशी, तुकाराम कोल्हे, गोविंद पाटील, रणजित पाटील, तानाजी कांबळे, बालाजी हाके, नरसिंग इंगळे, तक्रार निवारण समिती सदस्य डॉ. उमाकांत देशमुख यांच्यासह कारखान्यातील अधिकारी व कर्मचारी व ऊस उत्पादक शेतकरी आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव रविशंकर बरमदे यांनी केले. तर व्हा. चेअरमन प्रवीण पाटील यांनीउपस्थितांचे आभार मानले.
















