रेणापूर : प्रतिनिधी
तालुक्यात निसर्गाच्या कृपेने पाऊस चांगला झाल्याने यंदा उत्साहपूर्ण वातावरणात गणरायाचे आगमन झाले होते. १० दिवसांपासून सामाजिक संदेश देणारे देखावे, सामाजिक उपक्रम आणि विद्युत रोषणाई हे आकर्षण ठरले होते. मंगववारी दि. १७ रोजी गणेशमूर्तीचे रेणा नदी पात्रात विसर्जन होणार आहे. तर ज्यांना विसर्जन
करवयाचे नाही अशा गणेश मंडाळाच्या मूर्तीचे नगर पंचायत संकलन करणार असून कुठे गैरप्रकार होऊ नये म्हणून विसर्जन दिवशी तगडा पोलिस बंदोबस्त रस्त्यावर असणार आहे तर शहरात चौका -चौकात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमे-याद्वारे लक्ष राहणार आहे.
यावर्षी तालुक्यात ७१ परवानाधारक गणेश मंडळानी श्रीची स्थापना केली होती यापैकी १२ गावात एक गाव एक गणपती याचा अवलंब करीत श्री स्थापना केली. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नगर पंचायतच्या वतीने विसर्जन मिरणूक मार्गावरील सर्व रस्त्यांची दुरुस्ती करून पथ दिवे लावण्यात आले आहेत. तसेच बॅरेकेट लावण्यात आले आहेत. ज्या गणेश मंडळांना मूर्तीचे विसर्जन करवयाचे नाही अशा गणेश मंडळाकडून मुर्तीचे संकलन करून त्या मुर्त्या पंचायतीच्या गोदामामध्ये ठेवण्यात येणार आहेत.
श्रीच्या विसर्जनासाठी रेणा नदी पात्राजवळ नगरपंचायतीच्या वतीने अधिकारी संवर्गातील ६, कर्मचारी १०, घन कचरा व्यवस्थापनातील ३० कर्मचारी विसर्जन होईपर्यंत तैनात राहणार असून गणेश मंडळाने सहकार्य करावे असे आवाहन नगरपंचायत पाणी पुरवठा विभागाचे अभियंता विशाल विभुते व बांधकाम विभागाचे अभियंता मंगेश देशमुख यांनी केले.