रेणापूर : प्रतिनिधी
जून महिना संपला मात्र रेणापूर तालुक्यात अद्याप पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. मृग नक्षत्र ओलांडून आर्द्रा नक्षत्राचे पहिले चरणही संपले तरी दमदार आणि सलग पावसाने हजेरी लावली नाही. आकाशात काळे ढग दाटून येतात मात्र पावसाच्या एकाही सरीविना परत जात असल्याने बळीराजाच्या आशा पुन्हा-पुन्हा मावळत आहेत.
तालुक्यातील पानगाव, कारेपूर, पोहरेगाव, रेणापूर व पळशी या पाच महसुली मंडळांंपैकी केवळ पानगाव मंडळात रविवारी ९८ मिमी पावसाची नोंद झाली तर रेणापूरमध्ये ३५ मिमी, कारेपूरमध्ये ३१ मिमी, पोहरेगावमध्ये २६ मिमी आणि पळशी मंडळात केवळ १० मिमी पाऊस झाला. त्यामुळे पानगाव मंडळात काही ठिकाणी सोयाबीन व तूर पेरणीस सुरुवात झाली असली तरी उर्वरित चार मंडळांतील शेतकरी अजूनही पेरणीयोग्य पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.दोन-चार रिमझिम सरींमुळे जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला नाही. त्यामुळे पेरणीसाठी आवश्यक वातावरण तयार झालेले नसून शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत. जोरदार आणि सलग पाऊस झाल्याशिवाय पेरणीला वेग येणार नसल्याचे कृषी जाणकारांचे मत आहे.
यंदा आधीच महागडी बियाणे, खतांच्या वाढलेल्या किमती, डिझेल-पेट्रोलमुळे वाढलेला मशागतीचा खर्च आणि शेतीमालाच्या भावाची अनिश्चीततेमुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. अशातच वेळेवर पाऊस न झाल्याने खरीप हंगामावर संकटाचे ढग दाटले आहेत. सिंचनाची सुविधा असलेल्या काही शेतक-यांनी नाइलाजाने पेरणी सुरू केली आहे. मात्र वारंवार होणा-या वीज खंडिततेमुळे पिकांना पाणी देणेही अवघड झाले आहे. महागडे बियाणे वाया जाण्याच्या भीतीने अनेक शेतकरी पेरणी टाळत असून, पाऊस उशिरा झाल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जून महिना संपला तरी पेरणीयोग्य पाऊस नाही. पानगाव वगळता चार मंडळांतील पेरण्या खोळंबल्या आहेत. महागडी बियाणे व खतांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
















