रेणापूर : प्रतिनिधी
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार रेणापूर तालुक्यात १६ गावांत ४८६ कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. त्यात घनसरगाव येथे ९७ नोंदी आढळून आल्या आहेत. नोंदी आढळून आलेल्याच्या वारसांना ९५ कुणबी प्रमाणपत्राचे गावात जाऊन उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे व अनुप पाटील यांनी बुधवारी दि. २४ रोजी वितरीत केले .
मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाची दखल घेत शासनाने कुणबी मराठा नोंद असलेल्यांना कुणबी मराठा प्रमाणपत्र देणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर रेणापूर तालुक्यातील १६ गावात ४८६ कुणबी जाती च्या नोंदी आढळून आल्या. या १६ गावापैकी घनसरगाव येथील माजी सरपंच शरद दरेकर यांनी तहसील कार्यालयाकडे ऑनलाईन प्रस्ताव दाखल करून तालुक्यात सर्वप्रथम पहिले कुणबी प्रमाणपत्र मिळवले. त्यानंतर त्यांनी गावात पुढाकार घेऊन नोंदी आढळून आल्या आहेत.
त्यांच्या वारसांना प्रमाणपत्र मिळविण्यासाठी लागणारे सर्व कागदपत्रे गोळा करण्यास मदत केली. सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर ऑनलाईन प्रस्ताव सादर केल्यानंतर याची पडताळी करून बुधवारी दि. २४ रोजी एकाच दिवशी ९५ प्रमाणपत्रे उपविभागीय अधिकारी कोरडे, पाटील यांनी घनसरगाव येथे जाऊन संबंधीताना वितरीत केली. यावेळी तहसीलदार डॉ. धम्मप्रिया गायकवाड, मंडळ अधिकारी कमलाकर तिडके, माजी सरपंच शरद दरेकर, माजी उपसरपंच बंटी शिंंदे, अॅड श्रीकांत सूर्यवंशी, तलाठी श्रीमती शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते .