रेणापूर : प्रतिनिधी
रेणापूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ४ गटांसाठी व पंचायत समितीच्या आठ गणांसाठी (शनिवारी दि. ७) शांततेत व उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत तालुक्यात एकूण ६७ .२९ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संदिप कुलकर्णी , सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत थोरात, तहसिलदार रामेश्वर स्वामी यांनी दिली .
रेणापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पानगाव, खरोळा, कामखेडा, पोहरेगाव या ४ गटासाठी तर पंचायत समितीच्या पानगाव, कोष्टगाव, खरोळा, कारेपूर, कामखेडा, मोटेगाव, पोहरेगाव, निवाडा या ८ गणासाठी शनिवारी (दि . ७ ) सकाळी ७ .३० ते . ५ . ३० या वेळेत मतदान झाले .सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग काहीसा मंद होता सकाळी ९.३० पर्यंत ९.९ टक्के ११.३० वाजेपर्यंत २३. १ टक्के १.३० वाजता ३८. ९१, दुपारी ३.३० वाजता ५२. ९५ टक्के असे मतदान झाले. प्रामुख्याने दुपारनंतर मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच तरुण मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावला. काही मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या तर खरोळा व दर्जीबोरगाव येथे तांत्रिक बिघाड झाल्याने या दोन्ही ठिकाणी तात्काळ मतदान यंत्र बदलण्यात आले तसेच सांगवी , माणुसमारवाडी येथे मतदारांची गर्दी वाढल्याने उशिरपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. एकुणच तालुक्यात मतदान प्रक्रियेदरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

