रेणापूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या रेणापूर येथील जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या शाखेत बुधवारी पहाटे धाडसी चोरीचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. चोरट्यांनी बँकेत प्रवेश करण्यासाठी पाठीमागील लोखंडी दार, गॅस कटरच्या सहायाने तोडून आत प्रवेश केला मात्र बॅकेतील आधुनिक सुरक्षा यंत्रणा (सायरन) शाखा व्यवस्थापक, कॅशिअर व पोलीसांच्या प्रसंगवाधामुळे चोरट्यांचा डाव फसला. गॅस कटरसह इतर साहित्य बॅकेतच टाकून चोरटे अंधाराचा फायदा घेत पसार झाले,
रेणापूर जाणा-या मुख्य व राष्ट्रीय महामार्गालगत गजबलेल्या ठिकाणी लातूर जिल्हा मध्यवर्ती बॅकेची शाखा आहे. तालुक्यात सर्वात मोठा आर्थिक व्यवहार या शाखेतून होतो. या शाखेचे मोठ्या प्रमाणात ग्राहक आहेत. मंगळवारी दि . २४ रोजी बॅकेचे कर्मचारी दिवसा बॅकेचे कामकाज संपल्यानंतर शाखा बंद करून आपआपल्या घरी निघून गेले. बुधवारी पहाटे दिड वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांने बॅकेच्या पाठीमागील दोन दरवाजे गॅस कटरच्या सहायाने तोडून बॅकेत प्रवेश करताच तेथे बॅक प्रशासनाच्या वतीने कार्यन्वीत करण्यात आलेले आधुनिक सुरक्षा यंत्रणा ( सायरन) वाजले. हे लक्षात येताच चोरट्यांनी त्या यंत्राचे वायर व सीसीटीव्ही कॅमे-याचे वायर तोडले मात्र शाखेतील सायरन वाजल्याचा मेसेज पहाटे ३.२० वाजण्याच्या सुमारास शाखा व्यवस्थापक दत्तात्रय पवार यांच्याकडे गेला असता त्यांनी लगेच बॅकेच्या वॉचमनला फोन केला मात्र त्याच्याशी संपर्क न झाल्याने रेणापूर येथे राहणारे बॅकेचे कॅशिअर किशन ठाकूर यांना फोन करून बॅकेचे सायरन वाजले आहे.
शाखेकडे जावून पहा सांगितले तेव्हा ठाकूर यांनी तात्काळ शाखेकडे धाव घेतली असता त्यांना बॅकेसमोर वॉचमन नसल्याचे त्यांनी बॅक इमारतीच्या परिसरात पाहणी केली असता त्यांना बॅकेच्या मागील दरवाजा उघडा असल्याचे निर्देशनास आले तेव्हा शाखा व्यवस्थापक पवार यांना फोन करून सदरची माहिती दिली तेव्हा पवार यांनी पोलीस ठाण्यात जाऊन माहिती द्या असे सांगितल्यानंतर तात्काळ ठाकूर यांनी पोलीस ठाणे येथे जाऊन घटनेची माहिती उपस्थित पोलीसांना दिली. संबंधीत पोलीस कर्मचा-यांने रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलीसांना याची माहिती दिली. त्यावरून गस्तीवर असलेल्या पोलीसांनी बॅक शाखेकडे पोलीस वाहनाचे सायरन वाजवत येत असल्याची चाहूल लागताच गॅस कटरसह इतर साहित्य बॅकेतच टाकून चोरटे अंधाराचा फायदा घेत पसार झाले.
गस्तीवर असलेले हवालदार मुंडे, वाहन चालक गिरी, दोन होमगार्ड हे घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी चायनल गेट काढून बॅकेत प्रवेश केला असता त्या ठिकाणी पोलासांना सायरन व सीसीटीव्ही कॅमे-यांचे केबल तोडल्याचे निर्दनास आले . बॅकेचे सुरक्षा रक्षक महादेव रंगनाथ बंडे यांचे हातपाय बांधून आरडा ओरड करू नये म्हणून तोंडात बोळा कोबलेला असल्याचे दिसले . तेव्हा त्यांची पोलासानी सुटका करून शाखेची पाहणी केली असता त्यांना शाखेच्या पाठीमागील दोन दरवाजे गॅस कटरच्या सहायाने तोडलेल्या अवस्थेत तसेच तिजोरी फोडण्यासाठी एक छोटी गॅस ची टाकी व गॅस कटरची मोठी टाकी व इतर साहित्य आढळून आले.
त्याबरोबर तिजोरी असलेल्या खोलीचा दरवाज्याचा कडीकोंडा तुटलेल्या अवस्थेत दिसून आला असली तरी तिजोरी मात्र सुरक्षित असल्याचे दिसले. या घटनेची माहिती गस्तीवरील हवालदार मुंडे यांनी सहायक पोलीस निरीक्षक शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गायकवाड, बीटजमादार विपीन मामडगे यांना मिळताच घटनास्थळी धाव घेऊन तेथील पाहणी करून उपविभागीय पोलीस अधिकारी रवीद्र चौधर याना माहिती दिली. या घटनेची फिर्याद शाखा व्यवस्थापक दत्तात्रय रावसाहेब पवार यांनी रेणापूर पोलीस ठाण्यात दिल्यावरून पोलीसांनी गुरनं ५३ / २०२६ कलम ३३१ ( ६ ) ६२ , ३ ( ५ ) बीएनएस नुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक रवीद्र शिंदे हे करीत आहेत

