रेणापूर : प्रतिनिधी
येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मावस बहिणीस पाहण्यासाठी दुचाकीवर आलेल्या बहीण-भाऊ ट्रकच्या धडकेने जागीच ठार झाल्याची घटना रविवारी दि. ३० ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान रेणापूरच्या ग्रामीण रुग्णालयासमोर घडली. या अपघातात दोणे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीवर लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात इतका भयानक होता की सदर मयताचे शव ट्रक चालकाने शंभर फुटांपर्यंत फरफटत नेले.
रविवार दि. ३० ऑगष्ट दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान एमएच- २४ बीबी १९६२ या दुचाकीवरून मयत प्रतिक सतीष क्षीरसागर, (वय २४ वर्ष )त्याची आई माया सतीष क्षीरसागर ( वय ४० वर्ष ) बहीण कल्याणी राघू घोबाळे (वय २० वर्ष) मयताचा पुतण्या साई प्रशांत क्षीरसागर ( वय ६ वर्षे ) हे सर्व ( रा.धर्मापुरी हल्ली मुक्काम कव्हा रोड लातूर) हे चौघे जण सदरील दुचाकीवरून रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात सेलू-जवळगा येथील मयत प्रतिक याची मावसबहीण नंदिनी विलास भोसले यांना पाहण्यासाठी रुग्णालयात येत होते. नेमके याच वेळी परळीहून आष्टामोड मार्गे बिदरला जाणारा केए-३९, ८१६० या क्रमांकाच्या लोडिंगच्या ट्रकने वेगाने दुचाकीस पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात प्रतिक सतीष क्षीरसागर, कल्याणी राघु घोबाळे या दोघा बहीण-भावांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात मयताची आई माया सतीष क्षीरसागर व पुतण्या हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्याना लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच उप विभागीय अधिकारी राजेंद्र मायने, पोलिस निरीक्षक सुधाकर देडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे, बिट जमादार विपीन मामडगे, शिवराज आनंतवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती.
















