रेणापूर: सिद्धार्थ चव्हाण
तालुक्यात यंदा पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, त्याचा फटका आता शहरांनाही बसू लागला आहे. रेणापूर शहरासह अर्ध्या तालुक्याला पाणीपुरवठा करणा-या रेणा मध्यम प्रकल्पात गतवर्षीचा केवळ १९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे.
रेणापूर शहरात दर आठ दिवसांनी पाणीपुरवठा केला जाईल, असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात नियोजनाअभावी अनेक भागांतील नागरिकांना १५ ते २० दिवसांनंतर पाणी मिळत आहे. त्यामुळे महिलांसह नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करून नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.दरम्यान, रेणापूर नगरपंचायतीने घरपट्टी वसुलीसाठी घरोघरी पावत्या वितरित केल्या आहेत. यापूर्वीच घरपट्टी वाढीमुळे नागरिकांमध्ये नाराजी असताना, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर करांचा आर्थिक भारही वाढला आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
















