15.2 C
Latur
Wednesday, November 12, 2025
Homeमहाराष्ट्ररेल्वे कंत्राटावरून वाद; ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला

रेल्वे कंत्राटावरून वाद; ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला

मीरारोड : प्रतिनिधी
रेल्वेची कामे करणा-या ३ मराठी भावंडांवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना भाईंदरमध्ये घडली आहे. भाईंदर पोलिसांनी या प्रकरणी ८ जणांवर गुन्हा दाखल केला असून एका हल्लेखोरास अटक केली आहे.

भाईंदरच्या राई गावात राहणारे रूपेश पाटील, भूषण पाटील, नितेश पाटील हे आगरी समाजातील तिघे भाऊ मिळून रेल्वे व अन्य सरकारी कामे कंत्राटाने घेतात. मंगळवारी सायंकाळी हे तिघे भाऊ, रूपेश यांचा मुलगा यश व सहकारी संकेत म्हात्रे हे भाईंदर पश्चिम धक्काजवळ रेल्वे अधिकारी यांना भेटण्यास गेले होते. त्यावेळी तेथे रेल्वेचे कंत्राट घेणारा जयेश माजलकरसह महेश शेट्टी, राहुल शर्मा व त्यांचे अन्य ४-५ साथीदार काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून आले.

माझ्या कंपनीला रेल्वेने बॉयकॉट केले असे लोकांना खोटे का बोलत आहे? अशी रूपेश यांनी जयेशला विचारणा केली. त्याचा राग येऊन जयेश, शेट्टी, शर्मा आणि अन्य साथीदारांनी त्या सर्वांच्या अंगावर धावून धक्काबुक्की व मारहाण सुरू केली.

रूपेश यांना हृदयविकाराचा आजार असल्याने त्यांना वाचवण्यासाठी भूषण व नितेश मध्ये आले असता जयेश याने गाडीतील लोखंडी रॉड काढून भूषणच्या पायावर व डोक्यावर मारून जखमी केले. महेश शेट्टी, शर्मा व अन्य साथीदार यांनी गाडीतून लोखंडी रॉड, लाकडी दांडे, चॉपर काढून रूपेश, भूषण, नितेश यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. नितेशच्या डोक्यावर रॉड मारला. जयेश व साथीदारांनी, आमच्या नादी लागल्यास घरी येऊन जीव घेऊ अशी धमकी दिली. रक्तबंबाळ झालेले तिघे भाऊ हे जीव वाचवून गाडीतून निघून जात असताना गाडीवर हाताने व काठीने फटके मारले. त्यांनी पोलिसांना मदतीसाठी कॉल केला, मात्र जीवाच्या भीतीने तेथे न थांबता निघून गेले.

पोलिस त्यांना बॉम्बे मार्केट नाक्याजवळ भेटले. भूषण व नितेश यांच्या चेहरा, डोक्याला जखमा होऊन रक्त वाहत होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. रूपेश यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर भाईंदर पोलिसांनी पहाटे तीनच्या सुमारास जयेश माजलकर, महेश शेट्टी, राहुल शर्मासह अन्य ४-५ साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी राहुल शर्मा याला अटक केली असून बाकीचे आरोपी मात्र पसार झाले आहेत.

प्राणघातक हल्ला करून खंडणीचा बनाव
पाटील बंधूंवर प्राणघातक हल्ला केल्यानंतर ते जखमी अवस्थेत जीव वाचवण्यासाठी पळून जात असताना हल्लेखोरांनी व्हीडीओ काढून सांगा किती खंडणी पाहिजे? अशी विचारणा करत व्हीडीओ बनवला. नंतर राहुल शर्माने पोलिस ठाण्यात जाऊन पाटील बंधूंवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR